अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दहावी – बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..

दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील ११ गरीब , होतकरू विद्यार्थ्यांचे घेतले शैक्षणिक पालकत्व..
पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने १० व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती , शिरूर , भोर, वेल्हा येथील विद्यार्थी व पालक आवर्जून उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा व आपल्या समाजबांधवांना रोजगार उपलब्ध करून द्यावा” असे उदगार राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ गोविंद कुलकर्णी यांनी काढले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महासंघातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील ११ गरीब , होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन भगवान परशुराम स्कॉलरशिप देण्यात आली.

आगामी काळात विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात महासंघ कायम त्यांच्या सोबत असेल , त्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी , JEE , CET , NEET साठी तज्ज्ञांकडून सेमिनार , वेबिनार आयोजित करण्यात येतील अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी यावेळी दिली. या प्रसंगी पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी ची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाला ५०० हून अधिक पालक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या प्रा. उर्मिला दीक्षित यांनी मुलांना करिअर मार्गदर्शन केले व मुलांच्या मनातील शंकांचे निरसन केले.



कुणाल शैलेश टिळक यांना प्रतिभावंत युवा पुरस्कार



दरवर्षी प्रमाणे यंदाचा प्रतिभावंत युवा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कुणाल शैलेश टिळक यांना अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीने प्रदान करण्यात आला.
“अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे ब्राह्मण समाजासाठी असलेले योगदान खूप मोठे आहे , गरीब मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी आपण उचललेले पाऊल समाजापुढे एका आदर्श निर्माण करते व या कार्यासाठी माझे सदैव योगदान असेल” असे गौरोवोद्गार कुणाल टिळक यांनी आपल्या भाषणात काढले व एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.



अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली , जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी ) सौ केतकी कुलकर्णी यांनी महासंघाची माहिती दिली , स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार अनिरुद्ध पळशीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























