पालखी मुक्कामाच्या परिसरात साफसफाईची कामे अपुरी

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आदी पालख्यांचे आगमन १५ दिवसांवर येऊन ठेपले तरी, महापालिकेकडून होणारी स्वच्छतेची, रस्ता दुरूस्तीची कामे अद्याप झालेली नाहीत.
पालख्यांचा मुक्काम या परिसरातील मंदिरांमध्ये असतो. हजारो वारकरी दोन दिवस मुक्कामाला असतात. पालख्यांच्या दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांची गर्दी उसळते. महापालिकेच्या घनकचरा विभागावर स्वच्छतेचा ताण पडतो. तरी, सफाई कर्मचारी काम करतात. आरोग्य सेवेसाठी महापालिकेचे दवाखाने सज्ज असतात. मात्र, यंदा पालखी मुक्काम मंदिर परिसरात स्वच्छता आणि रस्ता दुरूस्तीचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही.
या संदर्भात माजी नगरसेवक विशाल धनावडे यांनी तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालखी मुक्कामाच्या ठिकाणच्या सुधारणांच्या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. पण, कामं मात्र झालेली नाहीत. बुधवार पेठ चौक ते पासोड्या विठोबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तिथेही पावसाळी लाईन्स साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठलेले रहाते. नाले सफाई सुद्धा झालेली नाही.

























