मराठी संवादावरून सराफ दुकानदाराकडून मराठी लेखिकेचा अपमान: लेखिकेचे आंदोलन सुरू

मुंबई : मराठी बोलण्यास नकार देत एका सराफ दुकानदाराने ज्येष्ठ मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना अपमानित करत पोलिसांकरवी दुकानातून हुसकावून लावले. मुंबईतील कुलाबा भागात हा प्रकार घडला असून या प्रकारानंतर याविरोधात शोभा देशपांडे यांनी दुकाना बाहेर गेल्या १८ तासापासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
देशपांडे या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स मध्ये सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी दुकानदारा बरोबर मराठीत संवाद साधला व दुकानदाराने ही मराठीत बोलावे अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र दुकानदाराने त्याला विरोध करत आम्हाला तुम्हाला वस्तू विकायची नाही असे सांगत अपमानित केले. यावर देशपांडे यांनी दुकान चालवण्याचे लायसन्स मागितले मात्र दुकानदाराने पोलीसांना बोलावून घेतले. आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी देखील हिंदीतच बोलून दुकानदाराची बाजू घेत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. संबधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी करत देशपांडे यांचे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
एका ज्येष्ठ मराठी लेखिकेने मराठी भाषेच्या अस्मितेसाठी घेतलेल्या आक्रमक पवित्रा बद्दल त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे आता. या विषयात ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.



