पालिकेतील सत्ताधारी पक्षाची प्रशासनावर पकड नसल्याने शहराची दयनीय अवस्था : धुमाळ

अतिवृष्टीचा इशारा असताना सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक अडचणीत
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह
पुणे : मुसळधार पावसाचा इशारा असतानाही प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणा मुळे शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधी रुपये नाले, पावसाळी व ड्रेनेज लाईन सफाईच्या कामांवर खर्च केले जातात. पण अशा पावसात खरच ही कामे गेली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीचा इशारा असताना महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोणतीच पूर्व तयारी करत नसल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
मागील वर्षी प्रमाणे आता सुरू असलेल्या अतिवष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून जाणे, घरांमध्ये पाणी शिरणे असे प्रकार घडत आहेत. या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मागील ३ वर्षातील कामांचा आढावा घेवून त्याचा अहवाल मुख्य सभेपुढे ठेवावा अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे महापालिकेकडून दरवर्षी काेटयावधी रूपये खर्चून नाले साफसफाई केली जाते. तसेच ओढे नाल्याच्या कडेने अनेक ठिकाणी सिमाभिंती बांधणे व स्ट्रोम वाॅटर लाईन्स बाबत निविदा काढताना प्रशासन संगनमताने निविदेपूर्वी विशिष्ट ठेकेदार कंपनी डाेळयासमाेर ठेवून काम करत असल्याने भ्रष्टाचार होत असून प्रत्यक्ष कामे झालेली नसल्याचा आरोप धुमाळ यांनी पत्रात केला आहे.
सत्ताधारी पक्षाची प्रशासनावर व खातेप्रमुखांवर पकड नसल्याने चुकीच्या पध्दतीने खातेप्रमुख कामे करीत असून वादग्रस्त निविदा राबविण्यात मग्न असल्याने पुणे शहराची ही दयनीय परिस्थिती झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे दिपाली धुमाळ यांनी म्हंटले आहे.
मागील २ वर्ष पुणे शहरात कमी वेळेत अतिवृष्टी झाल्याने ओढे नाले ओसंडून वाहून त्याकडेने असलेल्या वसाहतींध्ये पाणी शिरल्याने माेठया प्रमाणात जिवित व वित्तीय हानी झाली हाेती. पुणे महापालिका एका बाजूला ७३०० काेटी रूपयांचे अंदाजपत्रक तयार करते, पुणेकर काेटयावधी रूपये कराच्या रूपाने पुणे मनपा तिजाेरीत जमा करतात. परंतू शहरावर अतिवृष्टीसारखे संकट आल्यावर २४ बाय ७ असणारा आपत्ती व्यवस्थापन विभाग नक्की काय करताे? हा प्रश्न पुणेकरांसमाेर पडला आहे. पुणे शहरात मुसळधार पाऊस येणार असा अंदाज असताना सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडे संपूर्ण सुसज्ज यंत्रणा असणे अपेक्षित हाेते, मात्र तसे चित्र दिसत नाही.
माेठया पावसात माेठे वृक्ष काेसाळून जिवित हानी हाेणे, रस्ते बंद हाेणे, फांद्या विदयुत लाईन्सवर पडल्याने वीज पुरवठा खंडित हाेणे या सर्व बाबींची जाण प्रशासनाला असतानाही प्रशासन सर्व बाबींवर उपाय याेजना करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे अतिवृष्टीत निष्पाप नागरिकांचा बळी जाणे अशा दुर्देवी बाबी घडत आहेत. पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आतातरी प्रशासनाने खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात व या संदर्भात संबंधित खात्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.



