बावधनमध्ये पुणे शहरातील सर्वात मोठं नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल व उद्यान करण्यासाठी त्या जागा परत गावाला द्या..

किरण दगडे पाटील यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी..
बावधन : मौजे बावधन बुद्रुक मधील सरकारी गायरान मिळकतीमधील बरेचशे क्षेत्र वेगवेगळ्या संस्था व विभागांना वाटप करण्यात आलेले आहे, मात्र हे क्षेत्र ज्या हेतूसाठी देण्यात आले त्यासाठी त्याचा वापर झालेला नसून विकसित ही केलेले नाही त्यामुळे ते सर्व क्षेत्र बावधन गावाच्या विकासासाठी व येथील रहिवासी यांच्या हितासाठी परत गावाला उपलब्ध करून देण्यात यावे व उर्वरित क्षेत्र यापुढे कोणालाही वाटप करण्यात येऊ नये अशी मागणी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे केली आहे. बावधन मध्ये पुणे शहरातील सर्वात मोठं नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल व उद्यान तयार करायचे आहे आणि त्यासाठी जागेची गरज आहे या मुद्द्याकडे दगडेपाटील यांनी बावनकुळे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या बावधन मधील जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बावधन मधील विविध मुद्द्यांवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर सकारात्म चर्चा झाली.
बावधन बुद्रुक मधील लोकवस्ती मोठ्याप्रमाणावर वाढली असून महापालिकेत या गावाचा समावेश झालेला आहे. त्यामुळे या परिसराच्या शाश्वत विकासासाठी, सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागेची आवश्यकता आहे. परंतु बावधन मधील असणारी गायरानाची जागा काही संस्थांना वाटण्यात आली असून त्यांच्याकडून या जागेचा वापर करण्यात आलेला नाही, त्यामुळे गावच्या विकासासाठी आणि लोकांना आवश्यक प्रकल्प राबवण्यासाठी गायरानाची जागा गावाला परत मिळावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यावेळी करण्यात आली.
या विशेष बैठकीस आमदार विक्रांत पाटील , प्रदेश सरचिटणीस भाजपा राजेश पांडे , मुळशी पॅटर्न चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे -पाठक, अल्पना वरपे , माजी सरपंच राहुल दुधाळे उपस्थित होते.



किरण दगडे पाटील म्हणाले, गावाचा विकास आणि स्थानिक नागरिकांचे हित हेच आमचे ध्येय आहे. बावधन चा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे पण नागरिकांना आवश्यक प्रकल्प राबवण्यासाठी मोकळ्या जागांची आवश्यकता आहे. गावातील गायरानाची जागा संस्थांना वाटप करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून त्याचा वापर केला गेला नाही त्यामुळे या जागा परत गावाला मिळणे गरजेचे आहे. या जमिनीवर पुणे शहरातील सर्वात मोठे नाट्यगृह, तसेच क्रीडा संकुल आणि उद्यान निर्मिती असे प्रकल्प स्थानिक नागरिकांसाठी उभे रहावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. या जागेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.






