महापालिकेचा डायलेसीस रुग्णांच्या जीवाशी खेळ..सुविधा नसलेल्या ठिकाणी वारजेतील सेंटर हलवण्याचा निर्णय..

माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी विरोध करत केली ही मागणी
पुणे : गेल्या ४ वर्षांपासून वारजे येथे पुणे महानगरपालिकेच्या असलेल्या कै.अरविंद बारटक्के दवाखान्यामध्ये असणारे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले डायलेसीस सेंटर या ठिकाणी उभ्या होणाऱ्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या कामासाठी दुसरी कडे हलवण्यास सांगितले आहे. मात्र ज्या ठिकाणी हे डायलेसीस सेंटर हलवण्यास सांगितले आहे त्या ठिकाणी तशी आवश्यक व्यवस्था नसताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग डायलेसीस रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केला आहे.

या सुरू आलेल्या प्रकाराला माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी विरोध केला असून जो पर्यंत मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही व डायलेसीस सेंटर साठी आवश्यक असणारी सर्व सुविधांनी युक्त अशी व्यवस्था दुसरीकडे होत नाही तो पर्यंत हे सेंटर दुसरीकडे हलवता येणार नाही असा पावित्र धुमाळ यांनी घेतला असून तसे निवेदन महापालिका आयुक्त व आरोग्य विभागाला दिले आहे.
कै.अरविंद बारटक्के दवाखान्यामध्ये दिपाली धुमाळ यांच्या पाठपुराव्यातून सुरू करण्यात आलेल्या या डायलेसीस सेंटरचा या परिसरातील रुग्णांचा चांगला फायदा होत आलेला आहे. शहरातून अनेक भागातून रुग्ण या ठिकाणी डायलेसीससाठी येत असतात. रुग्णांना आवश्यक सर्व सोई सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे .परंतु या ठिकाणी पुणे महानगरपालिका कै.अरविंद बारटक्के दवाखान्याच्या जागी पुणे महानगरपालिकेने एका खाजगी संस्थेला मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल विकसित करण्यासाठी दिली आहे. सदर हॉस्पिटल चे भूमिपूजन सुद्धा झाले आहे. त्यामुळे कै.अरविंद बारटक्के दवाखान्या मधील ओपीडी संत सेवलाल समाज हॉल विठ्ठलनगर वारजे मळवाडी येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. आता डायलेसीस सेंटर सदर जागेवरून संत सेवलाल समाज हॉल विठ्ठलनगर वारजे मळवाडी स्थलांतरित करण्याचे सांगण्यात आले आहे. ओपीडी स्थलांतरित करणे आणि डायलेसीस सेंटर स्थलांतरित करणे यातील फरक महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कळत नाही का असा प्रश्न या निर्णयामुळे चर्चेला आला आहे.
संत सेवलाल हॉल येथे एक्वा सिस्टम , लाइट व्यवस्था , फर्निचर काम व एसी तसेच जी डायलेसीस सेंटर साठी आवश्यक असणारी सेपरेट ड्रेनेज लाईन अशी व्यवस्था तिथे नाही, त्याच बरोबर तेथे लागणाऱ्या सोई सुविधा उपलब्ध नाहीत.जी एजन्सी हे डायलेसीस सेंटर चालवत आहे त्या एजन्सीला सुद्धा त्वरित हॉस्पिटल बंद करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. परंतु आम्ही संबंधित बांधकाम विभागाकडून माहिती घेतली असता त्यांच्याकडून पूर्ण प्रशासकीय मान्यता करिता किमान ६ महिन्याचा कालावधी लागणार असून त्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे काम सुरू होण्यास अजून वेळ आहे. तरी सुद्धा पुणे महानगरपालिका सदर डायलोसीस सेंटर स्थलांतरित करण्यासाठी अती घाई कशासाठी व कोणासाठी करत आहे ? असा सवाल बाबा धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
हे डायलेसीस सेंटर ज्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोई सुविधा उपलब्ध नसून आपण रुग्णांच्या जीवाशी खेळत आहात का ? एखाद्या रुग्णास काही बर वाईट झाल्यास त्यास पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार राहील असा इशारा धुमाळ यांनी निवेदनात दिला आहे.



सदर डायलेसीस सेंटर जोपर्यंत या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे काम सुरू होत नाही तोपर्यंत स्थलांतरित करून नये. महानगरपालिका हे डायलेसीस सेंटर स्थलांतर करण्याच्या निर्णयावर ठाम असेल तर आम्हास सर्व रुग्णांना सोबत घेऊन आंदोलन करण्याची कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
सदर सेंटर स्थलांतर करण्यास आमचा विरोध नाही परंतु ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोई सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी स्थलांतर करू नये. स्थलांतर करावयाचे असेल तर संपूर्ण सोई सुविधा उपलब्ध करून स्थलांतर करण्यात यावे.तसेच सदर डायलेसीस सेंटर ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे योजिले आहे त्याठिकाणी स्थलांतर करण्यास किमान ३ महिन्याचा कालावधी लागणार आहे असे धुमाळ यांनी सांगितले.



