भाईगिरी करणाऱ्या गुंडांकडून महिलेचा विनयभंग; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – रस्त्यावरून चालत जाणाऱ्या विवाहितेचा तिघांनी विनयभंग केल्याची घटना विश्रांतवाडी कळस येथे नुकतीच घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी संकेत सावंत (रा. कळस- माळवाडी, विश्रांतवाडी पुणे ) याच्यासह इतर अनोळखी दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर घटनेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे.

विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही त्यांच्या नातेवाईकांकडे विश्रांतवाडी चौकातून कळस या ठिकाणी चालली होती. कळस माळवाडी येथून पायी चालत असताना चौकात दुचाकीवर बसलेल्या काही तरुणांनी महिलेची छेडछाड करण्यास सुरुवात केली. यामध्ये आरोपी संकेत सावंत म्हणाला,”मी इथला भाई आहे, तू माझ्यासोबत चल” तर त्याच्यासोबत असणाऱ्या इतर दोघांनी “तू खूप दिसायला चांगली आहे, तुझे रात्रीचे पैसे असतील ते आम्ही देतो.” असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करून त्यांचा विनयभंग केला. संकेत सावंत इथला भाई आहे असे म्हणत इतरांनी विवाहितेला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर पीडित महिला तातडीने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरासह उपनगरातील अनेक चौकांमध्ये तसेच भर मध्यवस्तीत महिला तसेच मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वस्तीतील “भाई” म्हणवणाऱ्या गुंडांकडून अशाप्रकारे महिलांची भर वस्तीत छेडछाड होणे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहे.






