कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील उंदीर पकडायला प्रशासनाला पिंजरे भेट देत निषेध..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)पुणे शहराचे अनोखे आंदोलन…
पुणे : कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू असताना महिला प्रेक्षकाच्या पायाला उंदीर चावल्याचा प्रकार घडल्यानंतर नाट्यगृहातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध करत नाट्यगृहातील उंदीर पकडण्यासाठी प्रशासनाला पिंजरे भेट दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, पदाधिकारी रोहन पायगुडे, गिरीश गुरनानी, स्वप्नील खवले, अभिषेक लोहक उपस्थित होते. या प्रसंगी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध कार्यकर्त्यांनी केला.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडलेला प्रकार म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेला आणि ‘स्वच्छ भारत – सुंदर पुणे’ मोहिमेला सुद्धा काळिमा फासणारा आहे अशी टीका किशोर कांबळे यांनी यावेळी केली. पुणे शहराची ओळख म्हणजे येथे फुललेली समृद्ध नाट्यपरंपरा, सुसंस्कृत रसिक प्रेक्षक, आणि विविध कला सादर करण्यासाठीचे आदर्श व्यासपीठ. मात्र यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छता, आणि त्याहून गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक असल्याच्या भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पुणे शहर यांच्या वतीने तत्काळ नाट्यगृहात स्वच्छता मोहीम आणि फवारणी हाती घ्यावी, प्रेक्षकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, नाट्यगृहाची दुरुस्ती व व्यवस्थापन सुधारण्यात यावी अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या.






