एकलव्य कॉलेज जवळील रखडलेल्या रस्त्याच्या बाधित जागेचा ताबा महापालिकेकडे..लवकरच रस्त्याचे काम होणार सुरू

पाठपुराव्याला मिळाले यश : किरण दगडे पाटील
कोथरूड : कोथरूडमधील एकलव्य कॉलेजपासून महामार्गाकडे जाणाऱ्या व अनेक दिवसांपासून रखडेलेल्या डीपी रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या जागेची रीतसर ताबापावती पुणे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आली असल्याची माहिती या रस्त्यासाठी पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली. ताबा पावती झाल्याने खऱ्या अर्थाने आता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अनेक वर्ष रखडलेल्या एकलव्य कॉलेज ते महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते कारण महामार्गाकडे जाणाऱ्या पौड रस्त्याला पर्याय म्हणून या रस्त्याकडे पहिले जात होते, मात्र कर्वे पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून महामार्गाकडे जाणारा हा डीपी रस्ता एकलव्य कॉलेज जवळ जागा ताब्यात नसल्याने रखडलेला होता. आता हा रस्ता पूर्ण झाल्यास कोथरूड डेपो चौकात न जाता एकलव्य कॉलेज पासून हायवे सर्व्हिस रस्त्याकडे जाता येणार आहे.
हा रखडलेला रस्ता पूर्ण व्हावा यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनखाली माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून जागा मालक बांदल कुटुंबाकडे व महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आता जागेची ताबा पावती झाल्याने या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले अखेर प्रयत्नांना यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एकलव्य कॉलेज ते हायवे सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बांदल कुटुंबाकडे सतत पाठपुरावा केला आणि आज सदर रस्त्याच्या जागेची रीतसर ताबापावती पुणे महानगरपालिका अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देण्यात आली. आता रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच हा रस्ता पूर्ण होईल. यासाठी संपूर्ण बांदल कुटुंबाने केलेल्या सहकार्यामुळे संपूर्ण बांदल कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो.
महापालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले, रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या बांदल यांच्या जागेची ताबा पावती झाल्याने २ गुंठे जागेचा ताबा आला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे काम सुरू करून ते पूर्ण करण्यात येईल.






