पुणे शहर

वनाज ते चांदणी चौक महामेट्रो प्रकल्पाला मिळणार गती ; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

पुणे : वनाज ते चांदणी चौक महामेट्रो विस्तार प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, तसेच कोथरूड, बावधन आणि परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, या उद्देशाने केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील मेट्रो भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

नगरसेविका अल्पना वरपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, अतुल गाडगीळ, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका रूपाली पवार, स्वीकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, ॲड. गणेश वरपे, कोथरूड सिटिझन फोरमचे प्रशांत कानोजिया, निलेश सैंदाने, विशाल अट्टल, अमित बोत्रे, राहुल चव्हाण, तसेच पुणे महानगरपालिका व महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20251125 wa01783213374507166536090



बैठकीत वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या प्रगतीतील तांत्रिक, प्रशासकीय अडचणी आणि विविध त्रुटींवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची गती वाढविण्यासाठी आवश्यक त्या सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांच्या या प्रकल्पाबाबत. असणाऱ्या सूचना व अडचणीही जाणून घेत त्यावर सकारात्मक भूमिका मांडली.

कोथरूड, बावधन आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, प्रस्तावित मेट्रो स्थानकांची जागा, उड्डाणपुलाशी संबंधित नियोजन आणि नागरिकांच्या विविध मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

याबाबत नगरसेविका अल्पना वरपे म्हणाल्या की, कोथरूड कचरा डेपो ते लोहिया जैन आयटी पार्कच्या अलीकडपर्यंत दुहेरी उड्डाणपूल होणार असून त्यामध्ये भारतीनगर आणि कोथरूड बस डेपोचा चौक कव्हर होत आहे, तसेच कोथरूड बस डेपोला लागूनच मेट्रो स्टेशन होणार आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे . नागरिकांचीही तशीच मागणी असल्याने त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. आजच्या बैठकीत प्रकल्पाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच पुढील कार्यवाहीला वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले की, चांदणी चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यास भुसारी कॉलनी, बावधन तसेच मुळशी परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वनाज ते चांदणी चौक महामेट्रो विस्तार प्रकल्प हा पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या आढावा बैठकीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये