जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय आता सुट्टीच्या दिवशीही खुले राहणार

‘बार्टी’चे निर्देश
पुणे : शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय/आयुष शिक्षण आणि कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी केंद्रभुत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत. अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तथापि समित्यांकडे प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांनी उशीराने अर्ज सादर केल्याचे दिसून येते.

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत Sms/ Email व पत्राव्दारे संबंधित समित्यांमार्फत कळविण्यात येऊनही अनेक अर्जदार/विद्यार्थी यांनी संबंधीत समित्यांशी संपर्क साधलेला दिसून येत नाही. त्रुटी पूर्तता करण्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची आहे. अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता आवश्यकतेनुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी सुटटीच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवावे असे निर्देश मा. महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना दिले आहेत.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये याकरिता ज्या अर्जदार/विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्राबाबत त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरीत संपर्क साधावा व त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरुन समितीला विहित वेळेत निर्णय घेता येईल असे आवाहन दिपा मुधोळ-मुंडे, महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या (सर्व) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.



