पुणे शहर

कायम सफाई कामगारांना विस्थापित करू नका; मान्य पदाचे काम द्या..दोन हजार सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कायम सफाई कामगारांना त्यांच्या शेड्युल्ड मान्य पदावरील कामापासून विस्थापित करून कंत्राटी कामगारांकडून रस्ते सफाईचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप करत सुमारे दोन हजार सफाई कामगारांनी आक्रोश मोर्चा काढला. कायम कामगारांना त्यांच्या मान्य पदाचे काम तातडीने देण्यात यावे, महिलांना पुरुषप्रधान कामे देऊ नयेत तसेच बदल्या राहत्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरात करण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महापालिकेतील रस्ते सफाईचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यासाठी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठराव करून तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर स्वच्छता प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रक्रियेमुळे कायम सफाई कामगारांना एसओपीच्या नावाखाली त्यांच्या शेड्युल्ड मान्य पदावरील कामापासून दूर करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.

पुणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सफाई कामगारांच्या अनेक पिढ्यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत घाणीमध्ये काम केले आहे. सार्वजनिक रस्ते सफाई, ड्रेनेज लाईनची स्वच्छता, मृत जनावरे उचलणे, कचरा संकलन, मिश्रित कचऱ्याचे वर्गीकरण, गवत काढणे, चौकोनी चेंबर साफ करणे, सार्वजनिक शौचालयांची सफाई तसेच अपघात व नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत जोखमीची कामे सफाई कामगारांकडून केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कामगारांच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्यासाठी पूर्वी विविध समित्या व आयोगांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सफाई कामगारांना घाण भत्ता आणि वारस हक्कासारख्या तरतुदी लागू करण्यात आल्या. सफाई कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर पात्र वारसाला शेड्युल्ड मान्य पदानुसार काम देण्याची पद्धत सुरू होती. मात्र, आता बारमाही स्वरूपाचे काम कंत्राटी पद्धतीने देऊन कायम कामगारांच्या हक्काचे काम काढून घेतले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

महापालिकेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून त्यांच्याकडून सार्वजनिक रस्ते सफाईचे काम करून घेतले आहे. परिणामी, पूर्वी रस्ते सफाईचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांना आता कचरा गाडीवर कचरा भरणे, चौकोनी चेंबर साफ करणे, शौचालयांची सफाई करणे, रस्त्यावरील मिश्रित कचऱ्याचे वर्गीकरण करणे यासह वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारची कामे करण्यासाठी पाठविले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

“कायम कामगारांना त्यांच्या मान्य पदाचेच काम द्या”

यावेळी युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट आणि जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी प्रशासनाला इशारा दिला. “सफाई कामगारांच्या शेड्युल्ड मान्य पदाची जी सफाईची कामे आहेत, तीच कामे त्यांना देण्यात यावीत. कायम कामगारांना त्यांच्या मान्य पदाची कामे तातडीने देण्यात यावीत. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

याशिवाय सफाई कामगारांच्या बदल्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर करण्यात येऊ नयेत. कामगारांच्या राहत्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच बदली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. विशेषतः महिला सफाई कामगारांना पुरुषप्रधान स्वरूपाची कामे देऊ नयेत, अशी मागणीही संघटनेने केली.

या आंदोलनात कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, जॉईंट सेक्रेटरी कॉ. वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. करुणा गजधनी, कॉ. दिलीप कांबळे, कार्यालयीन चिटणीस कॉ. राम अडागळे, ज्येष्ठ सल्लागार कॉ. चंद्रकांत गमरे, कॉ. प्रकाश चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

विभागीय अध्यक्ष कॉ. तानाजी रिकीबे, कॉ. रमेश पारसे, कॉ. देवनाथ सदभैय्या, कॉ. अशोक कांबळे, कॉ. धनंजय आयवळे, सचिव कॉ. बाळासाहेब थोरात, कॉ. आण्णा ढावरे, कॉ. संतोष चव्हाण, कॉ. राजेश पिल्ले, कॉ. सूर्यकांत गवळी, कॉ. प्रमिला वाघमारे, कॉ. कुंदा कुमरे, कॉ. सुनील कांबळे, कॉ. विजय पवार, कॉ. सुनील मुलकुल, कॉ. अनिल पवार, कॉ. अरुण शेलार, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, प्रदीप येसांबरे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

आंदोलनाच्या माध्यमातून कायम सफाई कामगारांच्या हक्काचे काम काढून घेऊ नये आणि कंत्राटीकरणाच्या नावाखाली त्यांना विस्थापित करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये