‘निरोगी परिसर आणि स्वच्छ पर्यावरण हीच खरी गणेशभक्ती’

डेंग्यू प्रतिबंध आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ३०० विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
पुणे : डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तसेच आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या पुढाकाराने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, कीटक प्रतिबंधक विभाग, Cummins India Ltd., जनवाणी, स्वच्छ सहकारी संस्था, Rotary District 3131 आणि सरस्वती विद्यामंदिर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली.
या मोहिमेत सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे सुमारे ३०० विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, गांधी भवन, गणंजय सोसायटी, सुतार दवाखाना परिसर, गुजरात कॉलनी व वृंदावन कॉलनी या परिसरातून जनजागृती फेरी काढून नागरिकांना आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

‘आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस’ आणि डास प्रतिबंधाचा संदेश
डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रसार मुख्यतः डासांच्या उत्पत्तीस्थळांमुळे होतो. त्यामुळे नागरिकांनी घराच्या परिसरात तसेच टेरेसवर जुने टायर, डबे, रिकामी भांडी किंवा पाणी साचू शकणाऱ्या वस्तू ठेवू नयेत, साठलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पाण्याची भांडी झाकून ठेवावीत, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
तसेच आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक मलम, डास पळविणारे साधन व मच्छरदाणीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. हौद, विहिरी, तळघरे, पाण्याचे साठे व कमळकुंड आदी ठिकाणी योग्य पद्धतीने गप्पी मासे संवर्धन करण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.



पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी नागरिकांना शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळण्याचे आवाहन केले.
गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, नाला, विहीर किंवा ओढ्यामध्ये न करता पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत विसर्जन हौद किंवा घाटाचा वापर करावा, तसेच इच्छुक नागरिकांनी मूर्ती विसर्जनाऐवजी त्या महानगरपालिकेकडे दान करण्याचा पर्याय स्वीकारावा, असा संदेश देण्यात आला.
यासोबतच निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे योग्य वर्गीकरण करावे आणि निर्माल्य नदी-नाले किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकून जलप्रदूषण व अस्वच्छता निर्माण करू नये, असेही आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
‘डासांची उत्पत्ती रोखा, डेंग्यूला आळा घाला!’,
‘साचलेले पाणी हटवा, डेंग्यू-चिकनगुनिया टाळा!’,
‘शाडूमातीची मूर्ती वापरा, पर्यावरण वाचवा!’,
‘नदी-नाल्यात विसर्जन नको, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हवा!’
अशा प्रभावी घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
ही जनजागृती मोहीम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली.
यावेळी आरोग्य निरीक्षक किरण जाधव, करण कुंभार, राजेश आहेर, गणेश साठे, गणेश चोंधे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, दत्तात्रय दळवी, उमेश शिंदे, प्रमोद चव्हाण, निसार शेख, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, Cummins India चे संपत खैरे, सोमनाथ वाले, अनिल घोडेकर, जनवाणीचे समीर अजगेकर, नीता नाईक, जगन्नाथ ढगे, Rotary District 3131 चे रोटेरियन किरण इंगळे, जनसेवक बाळासाहेब दांडेकर तसेच कीटक प्रतिबंधक विभागाचे अमोल हवालदार यांच्यासह सरस्वती विद्यामंदिरचे कोल्हे सर, सरतापे सर, ढेपे सर आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
‘निरोगी परिसर आणि स्वच्छ पर्यावरण हीच खरी गणेशभक्ती’
या उपक्रमातून आरोग्यदायी नागरिक, डासमुक्त परिसर, स्वच्छ शहर आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव यांचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी प्रशासनाच्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करून डेंग्यू व इतर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून पुणे शहराच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.



