गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत मोठे बदल

पुणे : गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील विविध भागांत होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीत बदल केले आहेत. सकाळी सहा ते मध्यरात्रीपर्यंत हे बदल आवश्यकतेनुसार लागू राहणार आहेत.अत्यावश्यक सेवेतील वाहने, तसेच अग्निशमन, पोलिस आणि रुग्णवाहिकांना यातून वगळण्यात आले आहे.
शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.

शिवाजीनगरकडून शिवाजी रोडमार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनांनी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक आणि टिळक चौक मार्गे पुढे जावे. तसेच झाशी राणी चौक, खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान, सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) या मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहणार असली तरी या संपूर्ण टप्प्यात वाहनांना पार्किंग करता येणार नाही. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स आणि दोरांचा वापर करण्यात येणार आहे.
वाहनचालकांसाठी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक या रस्त्याच्या डाव्या बाजूस तसेच निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
केशवनगर-मुंढवा परिसरातही १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरते वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वाहने रस्त्यावर न लावता पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.



