सावित्रीबाई फुले यांचे स्मारक देखभालीची विजय डाकले यांनी घेतली जबाबदारी

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विजय डाकले यांच्याकडून स्तुत्य उपक्रम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची देखभालीची जबाबदारी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराध्यक्ष विजय डाकले यांनी स्वीकारली आहे.
राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ‘सामाजिक संस्था दायित्व ‘ योजनेअंतर्गत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे स्मारक देखभालीसाठी मिळावे याकरिता डाकले यांच्याकडून पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली आहे.
सेवाभावी वृत्तीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारांची संख्या पुणे या पुण्यभुमीत मोठी आहे. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाचे सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांचे देखभालीकरीता पुणे शहर व जिल्ह्यातील दानशुरांनी विशेष पुढाकार घेतल्यामुळेच अलीकडच्या काळात राज्यातील काही संरक्षित स्मारकांची नियमित स्वच्छता व देखभाल होऊ लागल्याने महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि गडकिल्यांचे वैभव टिकून राहण्यासाठी मदत होऊ लागली आहे.

या संदर्भात विजय डाकले म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील स्त्रियांच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील असतात. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एक वर्षासाठी दत्तक घेऊन सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे.राज्य पुरातत्वचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे व रत्नागिरी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी याकामी खुप मोलाची मदत केली. दत्ता जोरकर व अजित घस्ते यांचे मोलाचे सहकार्य झाले






