थोड आत्मचिंतन करा आणि.. ; भंडाऱ्यातील घटनेनंतर संजय राऊत यांचा सामनातून केंद्राला सल्ला

केंद्र सरकारने भंडारा जिल्ह्यातील घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा. असा सल्ला सामानाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी केंद्राला दिला आहे.
भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा.
दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणेने अश्रू गाळण्यापेक्षा आधीच योग्य खबरदारी घेतली तर रुग्णालयांमध्ये होणाऱया दुर्घटना आणि बालकांचे मृत्यू टळू शकतील. गोरखपुरात प्राणवायूअभावी शंभरावर बालके मरण पावली. भंडाऱ्यात दहा बालके आगीत जळून गेली. त्यांच्या अभागी माता-पित्यांचे अश्रूच खरे, त्या अश्रूत शापवाणी आहे. त्या शापाचे धनी प्रशासकीय यंत्रणेने होऊ नये. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. असे अग्रलेखात म्हंटले आहे.







