कर्वेनगरमधील नदीपात्रातील रस्त्याचे काम होण्यापूर्वीच तीन नगरसेवकांमध्ये श्रेय वादाची लढाई

अमोल साबळे
कर्वेनगर : शिवणे खराडी या नदीपात्रातील रस्त्याच्या कर्वेनगर मधील राजाराम पुल ते वारजे शिव दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच त्याचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेल्या श्रेय वादाच्या लढाईची चर्चा सध्या कोथरुड कर्वेनगर व वारजे परिसरातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगल्याचे पाहिला मिळत आहे.
शिवणे खराडी या नदी पत्रातील रस्त्याचे कर्वेनगर मधील राजाराम पुल ते वारजे शिव या दरम्यानच्या जागा ताब्यात आलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी जागा ताब्यात आल्या नसल्याने रस्त्याचे काम झालेले नाही. महापालिकेकडून मिळणाऱ्या जागेच्या मोबदल्यावरून काही जागा मालकांनी जागा दिल्या नसल्याने काही टप्प्यातील रस्ता रखडलेला आहे.
मागच्या आठवड्यात महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महापौर मुरलीधर मोहोळ व स्थानिक भाजपचे नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि नगरसेवक सुशील मेंगडे यांनी कर्वेनगर येथे या नदीपात्रातील रस्त्याची पाहणी करून जागा मालकांची बैठक घेतली. या पाहणी व बैठकीनंतर लगेच त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी आयुक्तांना बरोबर रस्त्याची वेगळी पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यानंतर वृत्तपत्र आणि माध्यमामध्ये नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि नगरसेवक सुशील मेंगडे या भाजप नगरसेवकांच्या दोन वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यात आपणच कसा या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. हेच या दोन नगरसेवकांनी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे नगरसेवक रस्त्याच्या श्रेय वादासाठी लढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनीही सोशल मीडिया वर आपण या रस्त्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले आहे.
भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये कामाच्या श्रेयासाठी चढाओढ झाली असती तर एकवेळ मान्य ही झाली असते. पण एकाच पक्षातील नगरसेवक या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी झटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आठ दहा वर्षापूर्वी आयुक्तांचा पाहणी दौरा असला का त्या भागातील सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी होत व आपापल्या भागातील प्रश्न त्यांच्या समोर मांडत. यावेळी नागरिकही ही उपस्थित राहून समस्या मांडत, पण आता नागरिकांना आयुक्त येऊन गेल्यानंतरच विविध माध्यमांमधून समजत आहे. आयुक्त ही एकाच भागात दोन वेगळे पाहणी दौरे कसे नियोजित करतात याचेही सर्वांना नवल वाटत आहे.







