पाऊसाचा जोर पुन्हा वाढणार 13 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचा अंदाज…

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत.
हवामान विभागाने हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्टला जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 9 ते 12 ऑगस्टदरम्यानही कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.



कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो.



