पुणे शहर

तृतीयपंथीयांसाठी आवश्यक योजना पालिकेच्या सभागृहात व शासन दरबारी मांडून मान्य करून घेऊ :  दिपाली धुमाळ

ट्रान्स जेंडर समोरील आव्हाने व गरजा यावरील चर्चा सत्रात विविध मुद्द्यांवर चर्चा

वारजे : तृतीयपंथी व्यक्तींना समाजात पुढे आणण्यासाठी चांगल्या शासकीय व महापालिका पातळीवर योजना असणे आवश्यक आहे. आतापर्यंत त्यांच्यासाठी चांगल्या योजना आंमलात आल्या नाहीत याची खंत वाटते.  तृतीयपंथीयांसाठी आवश्यक चांगल्या योजना सभागृहात मांडून त्या मान्य करून घेऊ असा विश्वास विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी व्यक्त केला.

कर्वे समाज संस्था, हरबिंजर ग्रुप व समाज विकास विभाग पुणे मनपा यांच्या वतीने आयोजित ट्रान्स जेंडर भगिनी यांच्या समोरील आव्हाने व गरजा यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धुमाळ बोलत होत्या.  या प्रसंगी महानगरपालिकेचे समाज विकास विभागाचे अधिकारी खुळे,  हरबिंजर ग्रुपचे नेवल पोस्टवाला, रुबी बक्षी , प्रदीप घोंगे, कार्यक्रमाचे संयोजक शिक्षण विभागाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक महेश ठाकूर, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती येनपुरे आदी उपस्थित होते. Discussion on various issues in the discussion session on the challenges and needs facing transgender

तृतीया पंथींच्या वतीने बोलताना दीपा भोसले यांनी जाणवणाऱ्या समस्या जीवन जगताना येणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या. ज्यावेळी आम्हाला घरातून हाकलून दिले जाते, आम्ही एकाकी पडतो त्यावेळी शिक्षणही कामाला येत नाही, अशावेळी भीक मागण्या शिवाय आमच्याकडे पर्याय राहत नाही. जीवन जगत असताना आरोग्याची सुविधा आम्हाला व्यवस्थित मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जन्म दातेच घरातून हाकलून देतात तेव्हा समाजाकडून काय अपेक्षा करणार. आमच्यात पण शिक्षण घेतलेले आहेत त्यांना चांगले काम मिळाले पाहिजे. आपाच्याकडे बघण्याची समाजाची नजर बदलली पाहिजे.

कॉलेज व नोकरी होणाऱ्या त्रासामुळे कशी सोडावी लागली याची कैफियत एका तृतीपंथी व्यक्तीने यावेळी मांडली.   आम्हाला फक्त ससून रुग्णालयातच उपचार का शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये आमच्यासाठी किमान दोन कॉट तरी राखीव ठेवल्या पाहिजेत. अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

महेश ठाकूर म्हणाले की, शिक्षित तृतीपंथी व्यक्तींना संगणकाचे ज्ञान देता येईल का याचा विचार करता येऊ शकतो. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विचार सुरू आहे. यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन पातळीवर एक वेगळी हेल्पलाईन सुरू करता येईल का याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच हक्काच्या घरासाठी आवास योजनेसाठी योजना राबवता येऊ शकते.     

Img 20210116 wa0007

बाबा धुमाळ म्हणाले, या चर्चा सत्रातून समाजातील या घटकाच्या ज्या व्यथा पुढे आल्या आहेत, त्यावरून पालिकेकडून सर्वसामान्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात याचा लाभ देखील या घटकाला व्हावा यासाठी आपण आयुक्तांकडे मागणी करणार असून ती मान्य करून घेणार आहे. तसेच ससून व खाजगी रुग्णालयात या घटकासाठी राखीव कॉट ठेवण्यासंदर्भात पाठपुरावा करणार येईल. तसेच या घटकाला ओळखीचा पुरावा असावा यासाठी ओळखपत्र देण्याबाबतही आपण प्रयत्न करणार असून घराबाहेर पडू शकत नाही अशा ज्येष्ठ तृतीयपंथीयांना पेंशन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाऊ शकेल का यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.

महापालिकेचे अधिकारी खुळे म्हणाले पालिकेच्या माध्यमातून समाजातील या  घटकासाठी काय करता येईल कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत याचा विचार या चर्चा सत्राच्या माध्यमातून करता येईल. महादेव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर निवृत्ती येनपुरे यांनी आभार मानले. यावेळी धुमाळ यांच्या वतीने उपस्थित तृतीयपंथीयांना संस्कृतीची भेट म्हणून साड्या देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये