सत्तेच्या आसनावर बसल्यावर पुण्याची संस्कृती तुम्ही विसरलात ; पृथ्वीराज सुतार यांचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र..

पुणे : pune city – पालिकेतील सत्ताधारी भाजपने व प्रशासनाने कोरोना ची दुसरी लाट गंभीरपणे घेतली नसल्यानेच पुण्याची परिस्थिती आज हाताबाहेर गेली आहे. मात्र आपण केवळ प्रत्येकवेळी राज्यसरकारला जबाबदार धरून बिनबुडाचे आरोप करत आहात. आज पुणे मनपामध्ये आम्ही सर्व विरोधीपक्ष या आपत्तीमध्ये कसलेही राजकारण न करता आपल्या बरोबर राहीलो. अशा संकटाच्या काळामध्ये राजकारण करणे ही पुण्याची संस्कृती नाही, पण आपण या सत्तेच्या आसनावर बसल्यावर ही संस्कृती पूर्णपणे विसरले आहात. अशी टीका शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर केली आहे.
पृथ्वीराज सुतार यांनी मोहोळ यांना एक पत्र दिले असून त्यात पुण्यातील कोरोना बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. वर्षभरामध्ये पोझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून साधारण सहा हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्णांना मृत्यु झाला आहे, तसेच साधारण पंचावन्न हजाराच्या आसपास ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. ही सर्व आकडेवारी जर आपण पाहिली तर पुण्यामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असून, याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी भाजप व प्रशासन असल्याचे सुतार यांनी म्हंटले आहे.
रेमडिसिविरचे इंजेक्शन असू द्यात किंवा ऑक्सिजनचा पुरवठा असू द्यात,आपण प्रत्येक वेळेला राज्य सरकारला जाबाबदार धरत असून, आपण केवळ राजकीय हेतूने हे आरोप करीत आहात. आपण जर राज्य सरकारवर जर बिन-बुडाचे आरोप करणार असाल तर आम्ही सुध्दा जशास
तसे उत्तर आगामी काळात देऊ याची आपण नोंद घ्यावी असा इशारा या पत्रातून सुतार यांनी दिला आहे.

आम्ही गेल्या तीन महिन्यांपासुन या कोरोनाच्या परिस्थिती बाबत नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करण्याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने दिली पण प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे.
पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केलेले मुद्दे
१) आपत्तकालीन कक्ष फक्त नावालाच आहे,त्याच्या हेल्पलाईन वरील नंबरचा काहीही फायदा
रूग्णांना नाही.
२) खोठी व चुकीची माहिती त्या कक्षावरून सांगितली जाते.
३) प्रशासन सांगते की बेड वाढविले आहेत पण प्रत्यक्षात बेडची संख्या अपुरी आहे.
४) आपण आज मागील परिस्थितीप्रमाणे प्रत्येक भागामध्ये सीसीसी सेंटरची उभारणी करणे. आवश्यक होते,परंतु अद्यापही सेंटरची संख्या फक्त चार ते पाच अशीच मर्यादित आहे.
५) आपण किती खाजगी रुष्णालयांचे बेड ताब्यात घेतले ?
कोणत्या तारखेपासून घेतले व किती रुग्णालयांबरोबर Mou केला?
६) आपण ज्या कोथरूड भागाचे प्रतिनिधित्व करता त्या भागामध्ये एकही सीसीसी सेंटर अद्यापर्यंत आपण उभारू शकला नाहीत.
७) डॉक्टर्स,जर्सेस,आवश्यक तो मेडिकल स्टाफ अपुरा आहे.जो सध्याचा स्टाफ आहे त्यांच्यावर आपण किती ओझे टाकणार आहोत याचा सुध्दा आपण विचार केला पाहिजे.
अशा अनेक गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे, ज्यामुळे रुष्णांची हेळसांड होणार नाही. परंतु आपण मनपातील सत्ताधारी पुणेकरांचे डोळे पुसण्याचे काम न करता, पुणेकारांच्या डोळयात धूळ फेकण्याचे काम करीत आहात. सध्याच्या या वाढत्या परिस्थितीला आपण सत्ताधारी जबाबदार आहात हे वेळो-वेळी दाखवून दिले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन करणे, त्यासाठी सर्व नियमांची पायमल्ली करूण गर्दी जमवणे, प्रत्येक ठिकाणी आपण व आपल्या पक्षाचे नेते विकासकामांचे उद्घाटन करताना सर्व नियम धाब्यावर बसवून उदघाटने करीत होतात.
कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपण आजपर्यंत विरोधी पक्षाची दोन महिन्यांमध्ये एकही बैठक घेतलेली नाही. आपला व सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही आपण सर्व सत्ताधारी हे चुकीचे टेंडर प्रक्रिया राबविणे च्या प्रक्रियेमध्येच अडकून पडला आहात असा आरोप सुतार यांनी केला आहे.
आपण ज्या पध्दतीने कोरोनासाठी काम करीत आहात, ते पाहता पुणेकर निश्चितच आपणांस माफ करणार नाहीत. राज्य सरकारवर टिका करण्यापेक्षा आपल्या कार्यपध्दतीत बदल करून पुणेकरांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करा व या कोरोनाच्या संकटामधून बाहेर पडण्यास मदत करा,आम्ही विरोधी पक्ष म्हणून आपल्या सोबत पुणेकरांच्या हितासाठी योग्य त्या निर्णयांसोबत निश्चित राहू असे सुतार यांनी मोहोळ यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.



