पुणे शहर

प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे विद्यार्थ्यांमध्ये रमले..!

मुलांशी साधला आत्मिक संवाद…!!

पुणे : प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या धावपळीतून क्षणभर वेळ काढून जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या सहवासात रमतो, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना जवळून पाहतो आणि त्यांच्या भवितव्याची काळजी आपल्या शब्दांतून व्यक्त करतो, तेव्हा तो क्षण केवळ औपचारिक भेटीचा राहत नाही, तर संवेदनशील प्रशासनाचा प्रेरणादायी संदेश ठरतो. अशीच एक हृदयस्पर्शी भेट आज राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी येरवडा येथील बार्टीच्या परिसरातील सफाई कामगारांच्या मुला-मुलींच्या शाळा व वस्तीगृहाला दिली व तेथील मुलांशी आत्मिक संवाद साधला.

Img 20260724 wa00331776167532728884618
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी वर्गात बसून शिक्षक व मुख्याध्यापकांशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.

समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या येरवडा कॅम्प परिसरात आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर डॉ. कांबळे यांनी आवर्जून विद्यार्थ्यांची भेट घेतली. शाळेतील वर्गात प्रवेश करताच त्यांनी डिजिटल शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. वर्गात बसून शिक्षक व मुख्याध्यापकांशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.

Img 20260222 wa00063491038201882637992

यानंतर त्यांनी जवळच असलेल्या वस्तीगृहात जाऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, अभ्यासाची दिनचर्या, गाव, कुटुंब आणि भविष्यातील स्वप्ने याविषयी त्यांनी आस्थेने विचारपूस केली. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांकडून इंग्रजी वर्णमाला म्हणवून घेत त्यांच्या आत्मविश्वासाचे मनापासून कौतुक केले. चिमुकल्यांच्या निरागस हसण्यात आणि उत्स्फूर्त संवादात डॉ. कांबळे इतके रमले की, काही काळासाठी प्रशासकीय पदाची औपचारिकता बाजूला पडून ते विद्यार्थ्यांचे प्रेमळ मार्गदर्शक बनले.

विद्यार्थ्यांशी साधलेल्या या आत्मीय संवादातून त्यांचे स्वतःचे विद्यार्थी जीवनही त्यांच्या स्मरणात दाटून आले. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, शिस्त, आत्मविश्वास आणि प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता राज्यासाठी प्रेरणादायी ‘मॉडेल शाळा’ म्हणून विकसित व्हावी,” असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचित्रा शिंदे, विभाग प्रमुख शुभांगी पाटील, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड मुख्याध्यापक जयश्री चंडके तसेच समाजकल्याण विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Img 20260724 wa00327911567741817163796
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, प्रधान सचिवांचा जिव्हाळ्याचा संवाद आणि शिक्षणाबाबत व्यक्त झालेला दूरदृष्टीचा संकल्प यामुळे ही भेट वेगळी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये