पुणे शहर

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सन्मान गणेशोत्सव गुरुजनांचा… वारसा कार्यकर्त्यांचा!’ सोहळा उत्साहात

जय गणेश व्यासपीठ, पुणे शहरच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीतील गुरुजनांचा गौरव

पुणे : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून “जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर” यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीत अनेक वर्षे निस्वार्थ सामाजिक कार्य करत युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि संस्कार देणाऱ्या गुरुजनांचा “सन्मान गणेशोत्सव गुरुजनांचा… वारसा कार्यकर्त्यांचा!” हा विशेष सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Img 20260222 wa00063491038201882637992

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुजनांचे पारंपरिक पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर गुरुवर्य डॉ. संजय उपाध्ये (प्रसिद्ध लेखक, कवी व वक्ते) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गुरुजनांचा यथोचित गौरव करण्यात आला.

या प्रसंगी सुनिलभाऊ रासणे, महेश सूर्यवंशी, ॲड. प्रतापदादा परदेशी, डॉ. मिलिंद भोई तसेच आनंद सराफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेकजी खटावकर, विश्वास भोर, शिरीष मोहिते, विनायक घाटे, पियुष शाह, सागर पवार, नितीन पंडीत, उदय जगताप आणि पराग ठाकूर या मान्यवर गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.

गुरुवर्य डॉ. संजय उपाध्ये यांनी मनोगतात सांगितले की, “सामाजिक आचरणात सकारात्मक शुद्धीकरण घडवण्याची ताकद सार्वजनिक गणेशोत्सवात आहे.” अनुभवी गुरुजनांच्या मार्गदर्शनातून ही संस्कारमय परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचत असून, अशा गुरुजनांच्या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहणे हे भाग्याचे लक्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Img 20260727 wa00135101262246589665295

या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ, एरंडवणे, नवज्योत मित्र मंडळ, येरवडा, एकता मित्र मंडळ, अरण्येश्वर आणि श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, गणेश पेठ यांनी संयुक्तपणे केले. सचिन पवार, अमित जाधव, सुधीर ढमाले व कुणाल पवार यांनी संपूर्ण नियोजन केले. कार्यक्रमास पुणे शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव चळवळ ही केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि समाजप्रबोधनाची परंपरा आहे. या परंपरेचे जतन करणाऱ्या गुरुजनांचा गौरव करून “गुरुजनांचा सन्मान म्हणजे संस्कारांचा सन्मान” हा संदेश या सोहळ्यातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले. सुधीर ढमाले यांनी प्रास्ताविक केले, कुणाल पवार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले, तर सचिन पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये