पुण्यातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात; अजित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.(BJP corporator in Pune in touch with NCP; Excitement over Ajit Pawar’s statement)
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जामार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही अनेक वर्ष पिंपर-चिंचवडमध्ये कामं केली. मात्र 2013-14 मध्ये नरेंद्र मोदींची देशभरात हवा होती. त्यामुळे चांगलं काम करुनही आम्हाला विरोधात बसावं लागलं. परंतु आता भाजपमधील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना सांगतो, की ज्यांना यायचं आहे त्यांनी डिस्क्वालिफाय (अपात्र) झालं नाही पाहिजे. ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले तर पुढील 6 वर्ष ते निवडणूक लढू शकणार नाहीत. आत्ता जे आले आहेत ते अपक्ष आहेत, किंवा असे काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत, किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत.



