भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी ; त्यांचा आवाज दडपता येणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : महाविकास आघाडी सरकार बळाचा वापर करून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा आवाज दडपू पाहत आहे पण ही दडपशाही चालणार नाही. भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिला. BJP backed by Kirit Somaiya; His voice cannot be suppressed: Chandrakant patil
ते म्हणाले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. महाविकास आघाडी सरकारने त्यांना रोखण्यासाठी पोलीस पथक पाठवले, त्यांच्यावर दबाव आणला. कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, रेल्वे स्थानकावरून परत पाठवू, कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये स्थानबद्ध करू असे इशारे किरीट सोमय्या यांना या सरकारने दिले.
राज्यातील लोकशाही संपली का असा सवाल करून पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमय्या हे सुद्धा घाबरत नाहीत. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांनी उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे तार्किक शेवटाकडे नेली जातील. महाविकास आघाडीने दडपल्याने हे विषय थांबणार नाहीत.
मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो, याचा आपण निषेध करतो.




