शिक्रापूरजवळ विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू

पुणे : नगर महामार्गावर शिक्रापूर नजीक चोवीसावा मैल परिसरात ट्रक, कार व दुचाकीच्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर महामार्गवरून शिरूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच 12 डीजे 9657) हा रस्ता दुभाजक तोडून आपली मार्गिका बदलून पुणे दिशेला शिरला. या वेळी इर्टिगा (एमएच 12 आरके 1217) ही कार पुण्याहून नगरच्या दिशेने निघाली होती. हा ट्रक या कारवर आदळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला. परंतु याचवेळी बाजूला असलेल्या दोन दुचाकी (एमएच 12 आर 4050) आणि (एमएच 12 टीजी 9351) या अपघातात सापडल्या. यामध्ये दुचाकीवरील दांम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुचाकीवरील विठ्ठल पोपट हिंगाडे व रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. तर इर्टिगा कारमधील लीना राजू निकाशे (वय 18) हिचा मृत्यू झाला. दुसऱ्या मृताचे नाव अक्षय असल्याचे पोलिसांनी सांगितले.




