पुणे काँग्रेस भवनमध्ये राडा ; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याला जबर मारहाण

पुणे : काँग्रेस भवन मध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित असताना कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याचे पुढं आलं आहे. एक दिवसापूर्वीच शंकर महाराज मठात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आले असताना भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्यानंतर आज काँग्रेस भवन मध्ये मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे पुण्यात राजकीय पक्षांमध्ये सध्या काय सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे.
आज काँग्रेस भवन मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज पुणे लोकसभा निवडणुक’ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पण बैठक सुरू होण्यापूर्वीच अनुसूचित जाती जमाती माजी अध्यक्ष मुकेश धीवार यांना इतर कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला.

धीवार यांना मारहाण करणारे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा एका वरिष्ठ नेत्याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घतली होती. या नेत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यावेळी धीवर यांनी फ्लेक्स बाजी करत त्यांना विरोध केला होता. ही केलेली फ्लेक्स बाजी चांगलीच चर्चेत आली होती. आजही धिवार यांनी काँग्रेस भवन मध्ये फ्लेक्सबाजी केली होती. त्याच कारणावरून आजचा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे.










































