महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आणखी एक आव्हान

औरंगाबाद : वरळी किंवा ठाण्यातून आपल्यासमोर निवडणूक लढवण्याचं आदित्य ठाकरेंचं आव्हान झुगारून देत आपण अशी छोटी आव्हानं घेत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांना आणखी एक आव्हान दिले आहे.

२८ तासांत ४० कोटी खर्च कसा होऊ शकतो?

आदित्य ठाकरे म्हणाले,“मुख्यमंत्री लढवणार आहेत का माझ्यासमोर वॉर्डमध्ये निवडणूक? चला तिथेही लढू. वेदांत-फॉक्सकॉन राज्यातून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की आपल्या राज्यातून उद्योग बाहेर का जात आहेत यावर माझ्याशी समोरासमोर डिबेट करा. पण ते त्यावर काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतरही मोठे उद्योग राज्यातून बाहेर गेले.अजूनही उद्योगावर ते बोलू शकले नाहीत, आव्हान स्वीकारू शकले नाहीत. ते गुवाहाटीला डोंगर-झाडी बघायला गेले होते, डाव्होसला ते बर्फ बघायला गेले होते. २८ तासांत ४० कोटी खर्च कसा होऊ शकतो? तुम्ही उधळपट्टी करायचं जरी ठरवलं, तरी ४० कोटींचा खर्च होणार कसा? हा प्रश्न मला पडला. मी त्यांना म्हटलं यावर चर्चा करू. पण कुठेही त्यांच्याकडून उत्तर आलं नाही.”

Fb img 1647413711531 1

महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवा

“काल मी त्यांना म्हटलं वरळीतून निवडणूक लढवून दाखवा. त्यावर काही उत्तर आलं नाही. मग मी त्यांना म्हटलं वरळीतून नाही, तर ठाण्यातून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक आव्हान देतोय. माझी पहिली आव्हानं त्यांना स्वीकारायची नसतील, माझ्यासमोर लढायची त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक सोपं आव्हान मी त्यांना देतो. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण होण्याआधी या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आम्ही संविधानासाठी लढत आहोत

“राज्यपालांनी देशाच्या महापुरुषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा अपमान करत आले आहेत. पण कुठेही त्यांना बदलण्याच्या हालचाली दिसत नाहीयेत. राज्यपालांनी स्वत: म्हटलंय की त्यांना बदली पाहिजे. पण कुठेही मुख्यमंत्री त्यावर एक शब्दही बोलत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचे विषय घेणं गरजेचं आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणं गरजेचं आहे. दिल्लीत ते नेहमी स्वत:साठी बोलत आले.आज राज्यपालांविरोधात ते काहीच बोलले नाहीत. हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक आहे. ही लढाई फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही. आम्ही आधीही विरोधी पक्षात होतो, त्यात काहीही हरकत नाही. पण संविधान टिकणार की नाही यासाठी आमची ही लढाई आहे. आम्ही संविधानासाठी लढत आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये