कोथरूडमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते उभारण्यात आली सांस्कृतिक कलावंत गुढी…

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोथरूड : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने अभिनेत्री वंदना गुप्ते व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते सांस्कृतिक कलावंत गुढी उभारण्यात आली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असून त्यानिमित या कार्यक्रमाचे दरवर्षी प्रमाणे विशेष आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज, सुतार, बाल साहित्यिक राजीव तांबे, सुनील महाजन, नाट्य निर्माते सत्यजीत धांडेकर, समीर हंपी, सुगंधा शिरवाळकर, प्रशासकीय अधिकारी राजेश कामठे, मकरंद टिल्लू , प्रकाश पारखी आदी उपस्थित होते.
पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोथरूडकडे पहिले जाते. त्याच कोथरूड मध्ये अशा पद्धतीने दरवर्षी सांस्कृतिक कलावंत गुढी उभी केली जात असल्याने वंदना गुप्ते व संकर्षण कऱ्हाडे यांनी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे कौतुक केले.
कलाकारांच्या सांस्कृतिक गुढीची उंची वाढत जावो, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांकडून रसिक श्रोत्यांचे चांगले मनोरंजन होत राहो, तसेच वंदना गुप्ते व संकर्षण कऱ्हाडे यांच्या कुटुंब किर्रतन नाटकाचे हजारो प्रयोग होवोत अशा शुभेच्छा पृथ्वीराज सुतार यांनी यावेळी दिल्या.







