अजित पवार समर्थक विजय डाकले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला निशाणा.. म्हणाले विकास कामे केली असती तर..
पुणे : कोथरूड मध्ये गेल्या दहा वर्षात विकास काम रखडलेली आहेत. यापूर्वी कोथरूडच्या निवडणुका विचारांच्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर होत असत. आता यात्रा, जत्रा, आणि वाटप संस्कृतीच्या चुकीच्या पायंडा पाडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कोथरुडचा खरा विकास अजून मागेच राहिला आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी विजय डाकले यांनी आज कोथरुड मधून निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषद घेत जाहीर केले.
चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदार संघात विकास कामे केली असती तर त्यांना आज यात्रा, जत्रा, वाटप करत बसावे लागले नसते असा निशाणा ही डाकले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पाटील यांच्यावर साधला.
डाकले म्हणाले मागील दोन विधानसभा निवडणुकीवेळी चांगल्या प्रकारे तयारी करूनही पक्षाचा आदेश मानून मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली होती. सध्या कोथरुडमध्ये शिवसृष्टी, रस्ते, कचरा, ड्रेनेज, वाहतूकीसह अनेक प्रश्न तसेच आहेत. कोथरूडकरांना जात धर्म पंथ यातील राजकारणात रस नसून कोथरूडचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे अशी सर्वसामान्य कोथरूडकारांची भावना आहे.
गेल्या दहा वर्षात कोथरुडमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी आणि मूलभूत समस्या निर्माण झाल्या असून कोथरुडचे सध्याचे राजकारण पाहता मोठ्या प्रमाणात यात्रा, जत्रा आणि वाटप करण्याची वेळ इच्छुक उमेदवारांना आली आहे. कोथरूडचा भूमिपुत्र आणि गेली ३५ वर्ष मी या भागात सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने मला कोथरूड मधील विविध सामाजिक संघटना संस्था आणि पक्षातील कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
कोथरूड मतदार संघाची जागा राष्ट्रवादी पक्षाने लढवली पाहिजे व या ठिकाणी मला उमेदवारी मिळावी याकरिता आम्ही पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि शहराच्या स्थानिक नेतृत्वाला कार्यकर्त्यांच्या भावना कळविल्या असल्याचे डाकले यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोथरूड मतदार संघात महायुतीने आपल्याला उमेदवारी दयावी अशी अपेक्षा आहे. उमेदवारी न मिळाल्यास निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे डाकले यांनी सांगितले.