एकहाती सत्तेसाठी अजितदादा उत्सुक : पुणे जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी

पुणे : राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी आज अल्पबचत भवन येथे होणार आहे. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीच्या ‘क’ गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील’ अ ‘वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सातपैकी हवेली तालुक्यातील एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत आहे, तर उरलेल्या सहा जागांवर कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागलं आहे. रविवार, दोन जानेवारीला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.







