राज्यपालांचे माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण हा महाराष्ट्राचा अपमान : अंबादास दानवे

पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली, यातूनच त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट होतंय, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राचा हा आणखी एक अपमान आहे, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली आहे.

छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचं प्रकरण तापलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेलं पत्र आज उघड झालं. हे पत्र आणि राज्यपालांच्या भावना ढोंगी असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.



अंबादास दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ट्विटमध्ये म्हटलंय , राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे….
महाराष्ट्राचा हा आणखी एक अपमान आहे, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली आहे. तर राज्यपालांचं हे पत्र एवढ्या उशीरा का उघड झालं? असा सवालही उपस्थित करण्यात येतोय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या पत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पत्रावर 6 डिसेंबरची तारीख असताना आज 12 डिसेंबर रोजी ते का उजेडात आलं? यामागे नेमकं काय राजकारण आहे, असा सवाल त्यांनी विचारलाय.



ढोंगी राज्यपाल
राज्यपाल हे ढोंगी असून त्यांनी महाराष्ट्राची माफी न मागता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही व्यक्त केली आहे.






