अमित शाह यांनी राहूल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा..
पुण्यात पक्षाच्या अधिवेशनात अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
पुणे : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना माझा नमस्कार, मी पुण्यनगरीत आलो असून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा प्रणाम असं म्हणत अमित शाह यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुण्यात पार पडलेल्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शाह यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शाह म्हणाले जे विजयी होतात त्यांचं सरकार बनतं. परंतु राहुल गांधी यांना हरल्यावरही अहंकार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात येत्या निवडणूकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण सत्ता मिळवण्याच्या हेतूने काम करणारे लोक नाही आहोत. विचारधारेला घेऊनच भाजप पार्टीची स्थापना केली आहे. देशात आणखी 15 वर्षे भाजपचे सरकार राहणार असल्याचं शाह यांनी यावेळी म्हटलं आहे.
अमित शाह यांची शरद पवार यांच्यावर टीका
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटतं. पण शरद पवार यांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं होत, पण शरद पवार सत्तेत आल्यावर ते आरक्षण राहील नाही. शरद पवार म्हणजे भ्रष्टाचारांचा सर्वात मोठा सरदार असल्याचं म्हणत अमित शाह यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा वारसदार असल्याचं बोलतात पण ते आता कसाबला बिर्याणी देण्याची मागणी करणाऱ्यांसोबत जाऊन बसलेत. छत्रपती संभाजीनगर नामांतराल विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत असं म्हणत शाहांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मोदींच्या नेतृत्वात भरपूर विकासकामे महाराष्ट्रात झालीत. महाराष्ट्र आणि हरियाणा जिंकल्यावर राहुल गांधी यांचा अहंकार नाहीसा होईल असे शाह यांनी म्हंटले आहे.