विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा ; पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे आग्रही मागणी..
पुणे : महाराष्ट्रात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये खडकवासला
विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अशी आग्रही मागणी आज राष्ट्रवादीच्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना भेटून केली आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला २१००० हजार एवढं मताधिक्य या मतदारसंघातून
मिळालेले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या खडकवासला मतदार संघात सर्वात जास्त आहे. त्याच बरोबर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदार आपल्या विचाराचे नसल्याने या मतदार संघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा आमदार असणे अतिशय गरजेचे आहे. अशी भूमिका कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडली आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सदीच्छ भेट घेतली. गुरुपौर्णिमेच्या व उद्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शुभेच्छा देत असताना या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघ हा महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मिळावा व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा उमेदवार सदर मतदार संघात देण्यात यावा अशी विनंती सर्व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या असलेले पत्र दादांनी वाचून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पवार यांनी सुद्धा या मागणीला दुजोरा देऊन महायुतीच्या नेत्यांची ज्या वेळेस जागा वाटपा संदर्भात बैठक होईल त्या बैठकीत या पत्राचा संदर्भ देऊन आपली मागणी मी त्या बैठकीमध्ये मांडेन असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
या बैठकीला रुपाली चाकणकर, प्रदीप उर्फ बाबा धुमाळ दिलीपभाऊ बराटे, दत्तात्रय धनकवडे, आप्पा रेणुसे, शुक्राचार्या वांजळे, विकास दांगट, अक्रूर कुदळे, शैलेश चरवड, प्रवीण शिंदे, सायली वांजळे, दिपाली धुमाळ, सुवर्णा पायगुडे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, शंकर केमसे अश्विनी भागवत, सागर भागवत, राजेंद्र पवार, बाळासाहेब कापरे, दिवाकर पोफळे, मयूरेश वांजळे आदी उपस्थित होते.