रस्त्याने भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे रामबाग कॉलनी, एमआयटी कॉलेज परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

कायस्वरूपी कारवाईची हर्षवर्धन मानकर यांची मागणी..
कोथरूड : भरधाव वेगाने चालवल्या जाणाऱ्या गाड्या आणि जीव मुठीत घेऊन चालणारे पादचारी अशी परिस्थिती सध्या कोथरूड मधील अनेक रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याने वाहतुकीचे नियम धुडकावत वेगाने फिरणाऱ्या वाहनांमुळे तर एमआयटी कॉलेज रस्ता, रामबाग कॉलनी परिसरात सातत्याने अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या प्रकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
एम आय टी कॉलेज रस्ता व रामबाग कॉलनी परिसरात रस्त्याने भरधाव चालवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. दुचाकींचा वेग तर एवढा असतो की शेजारून ती वेगात गेल्यानंतर पादचाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. या भरधाव वाहनांमुळे रस्त्याकडेने चालणे, रस्त्याच्या बाजूला थांबणे धोक्याचे तर झालेच आहे पण सोसायट्यांच्या आवारातील नागरिक ही सध्या सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकताच रामबाग कॉलनीतील बेडेकर गणपती जवळ एक असा अपघात घडला की ज्यामुळे सोसायटीच्या आतील भाग ही सुरक्षित नसल्याचे पुढे आले. रात्रीच्या वेळी एक भरधाव कार सोसायटीची भिंत व गेट तोडून आत घुसली. हा अपघात रात्री उशीर घडल्याने खाली कोणी नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. अशा प्रकारांमुळे या भागात वेगात वाहने चालवणाऱ्यांवर चाप बसवणे गरजेचे बनले आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर म्हणाले, या भागात बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राहतात. रस्त्याने वेगाने वाहने चालवणारे हे कॉलेज मधील तरुण विद्यार्थी आहेत. पालकांपासून लांब असणाऱ्या या विद्यार्थ्यांवर ना संबंधित महाविद्यालयांचा अंकुश आहे ना प्रशासनाचा त्यामुळे ते मनमानी पद्धतीने या भागात वेगात वाहने चालवून असुरक्षित वातावरण निर्माण करत आहेत. याबाबत पोलिस व पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. परंतु तात्पुरत्या कारवाईने हा प्रकार थांबण्यासारखा नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष येथे कोणाच्यातरी जीवावर बेतू शकते त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी बेफाम वाहनचालकांवर कायमस्वरूपी कारवाईची नियोजन करावे अशी मागणी मानकर यांनी केली आहे.



कोथरूडमध्ये अपार्टमेंटची सीमाभिंत तोडत भरधाव गाडी शिरली आत.. भीषण अपघातात झाले मोठे नुकसान /https://www.sinhasannews.com/a-speeding-car-broke-through-the-boundary-wall-of-an-apartment-in-kothrud-major-damage-was-caused-in-a-horrific-accident-24357/






