कोथरूडमध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत असणाऱ्या बांधकाम साईटवर घडली घटना ; चुकीच्या खोदकामामुळे बाजूच्या पाच इमारतींना धोका..
कोथरूड : कोथरूड डिपी रस्त्यावरील श्री कॉलनीत असणाऱ्या श्री गणेश कृपा सहकारी गृहरचना संस्था पुनर्विकासासाठी घेतलेल्या स्वराज प्रॉपर्टी यांच्याकडून बांधकामासाठी चुकीच्या पद्धतीने खोदकाम करण्यात आल्याने बाजूने लावलेले पत्रे व माती मोठ्या प्रमाणात कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. या खोदकामामुळे आजूबाजूच्या पाच इमारतींना धोका निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.
मुळातच श्री गणेश कृपा सहकारी गृहरचना संस्थेचे पुनर्विकाचे काम सुरुवातीपासूनच कोथरूड मध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. या कामासाठी श्री कॉलनीतील महापालिकेने निधी टाकून केलेला रस्ता मोजणी नकाशात रस्ता गायब करून महापालिकेतून बांधकाम प्लॅन मंजूर करून घेण्यात आला होता. ही बाब स्थानिकांनी पुढे आणून पाठपुरावा केल्यानंतर मोजणी नकाशाची क प्रत रद्द करण्यात आली व नवीन क प्रत तयार केली गेली, रस्ता गायब करून मंजूर केलेला बांधकाम नकाशा रद्द करून नवीन बांधकाम नकाशा मंजूर करण्यात आला. या सर्व प्रकरणात महापालिका बांधकाम विभाग व भूमिअभिलेख विभगातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत कायमच संशय व्यक्त केला गेला. या प्रकरणात केवळ मोजणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ कडून नाममात्र कारवाई करण्यात आली होती.
आता पुन्हा हे बांधकाम चर्चेत आले आहे. बांधकामासाठी बिल्डरने चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्याचे पुढे आले गुरूवारी जेव्हा येथील पत्रे व माती ढासळल्याचा आवाज झाला त्यावेळी आजूबाजूला राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडाला. या चालू कामाला लागून असलेल्या इमारतीमधील घाबरलेल्या काही नागरिकांनी तर रात्र जागून काढावी लागली.
या खोदकामाच्या बाजूला पाच ते सहा रहिवाशी इमारती आहेत. या खोदकामामुळे यातील काही इमारतींचा पाया उघडा पडला असल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. खोदकाम करताना बांधकाम व्यावसायिकाने आवश्यक उपाययोजना न केल्याने पुढील आदेश येईपर्यंत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत महापालिका अभियंता बिपिन शिंदे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
बांधकाम व्यावसायिकाने चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्याने बाजूने असलेल्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत. या बांधकाम प्रकल्पात अनेक चुकीचे प्रकार घडले आहेत पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे पण आता तरी कोणती भयानक प्रकार घडण्याआधी प्रशासनाने जागे होणे आवश्यक आहे. आमचा सामान्य नागरिकांच्या बांधकामाला विरोध नसून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. या ठिकाणी कोणता अनर्थ घडल्यास त्याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील.
– विशाल भलके
स्थानिक रहिवाशी