समाजात स्वतःची “रियल हिरो” अशी आदर्श प्रतिमा तयार करा : पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनीकांत

विधीसंघर्ष ग्रस्त बालक व पालक यांच्यासाठी जनजागृती संवाद कार्यशाळेचे आयोजन
येरवडा – नकळतपणे झालेल्या चुकामध्ये सुधारणा करून आयुष्यामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. वाईट संगत, व्यसन आणि गुन्हेगारी वर मात करून स्वतःची समाजातील रियल हिरो अशी आदर्श प्रतिमा तयार करा, असे मत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनीकांत यांनी व्यक्त केले.

निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने परिमंडळ 4 विभागातील विधी संघर्षग्रस्त बालक आणि पालक यांच्यासाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आयोजित जनजागृती संवाद कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर, परिवर्तन संस्थेच्या रेश्मा कचरे, पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, निर्भय विद्यार्थी अभियानचे संस्थापक सदस्य दिलीप कुऱ्हाडे, निखिल गायकवाड, विवेक देव, पौर्णिमा गादिया, सीवायडीए संस्थेचे समुपदेशक कौस्तुभ उपस्थित होते.



वाढत्या व्यसनाधीनतेमुळे वाढती गुन्हेगारी व त्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग या गंभीर समस्या संदर्भात पोलीस उपायुक्त चुलू्मुला रजनीकांत यांनी विशेष उपक्रम सुरू केला आहे. विधी संघर्षग्रस्त बालकांशी थेट संवाद साधून त्यांच्या नेमक्या अडचणी, त्यांच्या आवडी छंद, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती तसेच त्यांना गुन्हेगारी व व्यसनांपासून परावृत्त करून कायमस्वरूपी पुनर्वसन असा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाची सुरुवात या कार्यशाळेच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी उपस्थित बालकांकडून प्रत्यक्ष संवाद साधून चर्चा व समुपदेशन करण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात त्यांच्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण उपक्रमासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र व सी वाय डी ए या संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी विधी संघर्ष ग्रस्त बालकांसाठी मोफत समुपदेशन व उपचार करणार असल्याचे सांगितले. सी वाय डी ए संस्थेच्या वतीने बालकांसाठी कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. उपस्थित मान्यवरांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला उपस्थित विधी संघर्ष ग्रस्त बालकाच्या आईकडून निर्भय विद्यार्थी अभियानाच्या वतीने पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या या चांगल्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. आमच्या मुलांना चांगले सांगणारे कोणी नाही. आम्ही कष्ट करणारे लोक आहोत. आपल्यासारख्या शिकलेल्या चांगल्या संस्काराच्या लोकांकडून आमच्या मुलांना सुधारण्याची संधी दिली जात आहे याबद्दल त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शिवले यांनी केले आभार विवेक देव यांनी मानले.






