मिलिंद नार्वेकर यांनी घेतली लक्ष्मण जगताप यांची भेट; तब्येतीची विचारपूस मात्र राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

पुणे : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज आमदार लक्ष्मण जगताप यांची बाणेर येथील ज्युपिटर हॅास्पिटल येथे भेट घेऊन जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गेल्या काही दिवसापासून जगताप आजारी आहेत.आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. हि भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात येत असले तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविण्यास सुरूवात झाली आहे.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे , युवासेना राज्य सहसचिव किरण साळी, माजी नगरसेवक प्रशांत बधे आणि जगताप यांचे बंधू शंकर जगताप उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये लक्ष्मण जगताप यांचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीतीचा भाग म्हणून या भेटी कडे पाहिले जात आहे.
जगताप हे गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने राजकीय दृष्ट्या सक्रीय नव्हते. आता त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा राजकीय सक्रीय होतील. अशातच आज शिवसेनेचे प्रमुख नेते मिलिंद नार्वेकर यांनी जगताप यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




