पुणे शहर

क्षेत्रीय कार्यालयातच जन्म, मृत्यू दाखले देण्याची व्यवस्था करा :  दिपाली धुमाळ



पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या कसबा जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले मिळण्यासंदर्भात योग्य ती व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कसबा जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयातून जन्म व मृत्युच्या नोंदी होवून क्षेत्रिय कार्यालयामार्फत नागरिकांना दाखले दिले जातात. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात जन्म व मृत्यु दाखले घेणेसाठी गेले असता नागरिकांना दाखले मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत माहिती घेतली असता कसबा जन्म मृत्यु कार्यालयात जन्म व मृत्युबाबतच्या नोंदी वेळेवर न झाल्याने दाखले मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

याबाबत वेळोवेळी संबंधित सहायक आरोग्य प्रमुखांना संपर्क करुन नागरिकांच्या तक्रारी सांगण्यात आल्या, पण यावर योग्यरित्या कार्यवाही न झाल्याने कसबा जन्म मृत्यु कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता या कार्यालयातील ढिसाळ कारभार निदर्शनास आल्याचे धुमाळ यांनी सांगितले. या कार्यालयात  प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत, नागरिकांना सोयीस्कर  माहिती मिळेल अशी व्यवस्था नाही,  कार्यालयामध्ये स्वच्छता नाही, कोरोना बाबतीत सुरक्षेची व्यवस्था नाही,  सुरक्षारक्षक नाहीत, लाईटची व्यवस्था सुरळित नाही अशा गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.

क्षेत्रिय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यु दाखले देणारे अधिकारी नागरिकांची पिळवणूक करत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची नागरिकांना जन्म व मृत्यु दाखले उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना आरोग्य विभागाकडून अन्य विभागाकडे जबाबदारी ढकलली जात आहे. संगणकीय कामकाज होत नसेल व त्याठिकाणी कर्मचारी नसेल तर सर्वांचा समन्वय साधून नागरिकांची गैरसोय-होणार नाही याची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य विभागाचीच आहे पण ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये