वारजेत अधिकृत भाजी मंडई नसल्याने ओटा मार्केटसाठी राखीव असलेल्या या जागेवर भाजी मंडई सुरू करावी

दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांडे मागणी
वारजे : वारजे माळवाडी परिसरामध्ये अधिकृत भाजी मंडई कुठेही उपलब्ध नसल्याने भाजी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच फिरते भाजी विक्रेते व शेतकरी आठवडे बाजार यावर सुद्धा महापालिकेद्वारे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते त्यामुळे महिलांना भाजी खरेदी करण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. त्यामुळे ओटा मार्केट साठी आरक्षित असलेल्या जागेवर भाजी मंडई सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडी मधील वारजे सर्वे न ११९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव शेजारी पुणे महानगरपालिकेची ओटा मार्केट साठी आरक्षित जागा आहे. या जागेवर नागरिकांच्या सोयीकरिता भाजी मंडई सुरू करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

सर्वे न ११९ मध्ये ओटा मार्केट विकसित करण्यासाठी महापलिकेची आरक्षित जागा उपलब्ध आहे. वारजे परिसरात कोठेही अधिकृत भाजी मंडई नसल्याने सदर ठिकाणी महापालिकेच्या वतीने कायम स्वरूपी भाजी विक्रेत्यांसाठी गाळे बांधून भाजी मंडई सुरू करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



धुमाळ म्हणाल्या, या ओटा मार्केटच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला होता. कामही सुरू झाले होते परंतु पुरेश्या निधी अभावी सदर ओटा मार्केट चे बांधकाम स्थगित झालेले आहे. या संदर्भात आयुक्तांनी योग्य ती दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही साठी सूचना दिल्या तर वारजेतील नागरिकांना भाजी मंडई मिळू शकते. त्यामुळे याकरिता आपण पाठपुरावा करत आहोत.






