पुणे शहर

कधीही बेड्स ताब्यात घेणार तयारीत रहा ; पुणे महापालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढच्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे शहरात आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असताना आता महापालिकेने शहरातल्या सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीही रुग्णालयातले बेड्स ताब्यात घेतले जाऊ शकतात, त्यामुळे तयारीत रहा, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही महापालिकेने शहरातले 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवलीय. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचनाही महापालिकेने रुग्णालयांना केल्या आहेत.

‘कोरोना रुग्णांना तात्काळ दाखल करून घ्या’
रुग्णांची स्थिती पाहून अनेक रुग्णालय रुग्णांना दाखल करून घेण्यात टाळाटाळ करत असल्याची काही उदाहरणं समोर आली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत रुग्णालयात येणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना नकार न देता त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठीही महापालिकेने सूचित केलं आहे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही.

Img 20210818 wa0002

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता आगामी काळात विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी उपलब्ध करुन दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्स उपलब्धतेबाबत माहिती सतत अद्ययावत ठेवण्यात यावी असंही महापालिकेनं पत्रात म्हटलं आहे. तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी आणि रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सुमारे सव्वा लाख सक्रिय कोरोनाबाधित होते. तिसऱ्या लाटेत या संख्येच्या दीडपट म्हणजे साधारणपणे एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, खाटा, सिलेंडर यांची उपलब्धता करून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये