पुणे शहर

… तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस म्हाळुंगेचा पाणी प्रश्न सोडवू! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागणार असेल, तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस म्हाळुंगे चा पाणी प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायाभूत सुविधा निर्माण करुन द्याव्यात असे आवाहन आ.‌पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, लहू बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक १२ च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, मंदार रारावीकर, राहुल कोकाटे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20220712 wa0009670795149631251448

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस म्हाळुंगेचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आयुक्त डॉ. विक्रम कुमार म्हणाले की, सूस, म्हाळूंगे ही गावे महापालिकेत नुकतीच नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सध्या पायाभूत सुविधा महापालिकेकडे नाहीत. त्या उभ्या करण्यासाठी काही वेळेची गरज आहे. पण बाणेर, बालेवाडी, पाषाण मध्ये तशी स्थिती नाही. बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये पायाभूत सुविधा आहेत.

ते पुढे म्हणाले की, बाणेर बालेवाडीची पाण्याची समस्या महापालिका तीन टप्प्यांत सोडवू शकते. त्यात प्रामुख्याने पम्पिंग स्टेशनचा आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार वाढवणे. त्यासोबतच एकसमान पाणी वाटपासाठी मीटरची संख्या वाढवणे. त्याशिवाय मागणीनुसार सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे, आदी उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.

आयुक्तांच्या प्रस्तावावर आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी दिवसागणिक प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन ज्या उपाययोजना करत आहेत, त्या पूर्ण होऊन इथल्या नागरिकांना समान पाणीपुरवठा होण्यास नक्कीच वेळ लागणार आहे. कारण, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी पाण्याची वाहतूक करणारी व्यवस्था महापालिकेकडे नसल्याने अनंत अडचणी येत आहेत. आजही अनेक ठिकाणी असमान पाणीपुरवठा होत आहे.

ते पाटील म्हणाले की, पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता, पुणेकरांची पाण्याची मागणी ही वाढत आहे. पुणे शहराला किमान एक कोटी टीएमसी पाण्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि तात्पूरता उपाय म्हणून महापालिका टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखवत आहे. पण टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात काही मर्यादा आहेत. एक कोटी टीएमसी पाणी हे टॅंकरने उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्याच्या साठवणुकीची व्यवस्था उभी करणं गरजेचे आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी अधिकाधिक क्षमतेच्या सिमेंटच्या टाक्या उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे ही व्यवस्था तातडीने उभी करणे महापालिकेला शक्य नसेल, तर लोकसहभागातून आम्ही २५ लाख लिटरच्या सिंथेटिक पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देऊ. त्यासाठीच्या आवश्यक परवानगी देऊन पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

या बैठकीवेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी कोणत्याही परिस्थितीत बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे मधील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याची आग्र‌ही मागणी केली. बैठकीचे प्रास्ताविक अमोल बालवडकर यांनी केले, तर लहू बालवडकर यांनी आभार मानले. पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये