पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ‘ऑफर’

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भारत राष्ट्र समितीने थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. ‘बीआरएस’चे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना ही ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले आहे.

बाळासाहेब सानप म्हणाले की, बीआरएसमध्ये नाराज नाही तर अनेक नवीन चेहरे रोज सहभागी होतात, जे आमदार 2-3 हजारांनी पडलेत ते देखील पक्षाच्या संपर्कात आहेत. पंकजा ताई बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू, त्या पक्षात आल्या तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचसोबत पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास मुख्यमंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न पत्रकारांनी सानप यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले. नक्कीच, देशाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करू, 100 टक्के मला विश्वास आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजाताई सक्षम आहेत, 100 टक्के त्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.



दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आषाढी एकादशीनिमित्त 27 जून रोजी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठू माऊलींच्या दर्शनासाठी येत आहेत. पुणे येथे ‘बीआरएस’चे मोठे कार्यालय होणार असल्याची घोषणाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



