शिवसेना, शिंदे गटात जोरदार राडा, बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप

मुंबई : राज्यात आता बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमध्ये वाद होताना दिसत आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडल्याची घटना घडली आहे. आमदार सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे.
शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना आमनेसामने आल्याने या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरुपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे गंभीर आरोप करत म्हणाले कि, सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही ते म्हणाले. दादर पोलीस स्थानकाच्या आवारात सरवणकर यांनी गोळीबार केला, असा त्यांनी आरोप केला आहे.
मागच्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमान उभा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्ष उभारला गेला होता. पण शिंदे गटातील शाखा प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झाले नाही, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यावरुनच हा वाद झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांना शिंदे गटाचे कार्यकर्ते नको त्या भाषेत बोलत असतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. सोशल मीडियावरही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचंही सुनील शिंदे म्हणाले. दरम्यान, यावेळी आपल्या असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर सदा सरवणकर यांनी केल्याचंही सुनील शिंदे म्हणाले.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी आपल्यावर करण्यात आलेले फेटाळून लावले. घरगुती वाद झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यातून हा सगळा हाणामारीचा प्रकार घडल्याचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.




