दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या उमेद फाउंडेशनला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मदतीचा हात..

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनचा उपक्रम
उमेद फाउंडेशन च्या बालक पालक प्रकल्पास सर्वोतोपरी मदतीचे चंद्रकांत पाटील यांचे वचन
पुणे : क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर हे त्यांच्या फाउंडेशन च्या नावाप्रमाणेच क्रिएटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि वेगळेपण जपणारे कार्यक्रम करत असतात. ते समाजात चांगलं काम करणाऱ्यांच्या शोधात असतात आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अश्या व्यक्ती / संस्थांना मदतीचा हात देत असतात, या कार्यात त्यांच्या पत्नी मंजुश्री खर्डेकर देखील त्यांना मदत करत असतात असे गौरवोदगार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
आज क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या उमेद फाउंडेशन ला सुमारे तीन महिने पुरेल येवढे जीवनावश्यक साहित्य देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोहोळ, धर्म जागरण मंचचे सीताराम खाडे, सुमित दिकोंडा, संस्थेच्या मार्गदर्शक सीमाताई दाबके, उमेदचे संस्थापक अध्यक्ष राकेश सणस आदी मान्यवर उपस्थित होते.

उमेद फाउंडेशनने पौड येथे 11 गुंठे जागा विकत घेतली असून तेथे बालक पालक प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला असल्याचे उमेद फाउंडेशनचे राकेश सणस यांनी सांगितले.
या प्रकल्पास मी सर्वतोपरी मदत करेन असे वचन पाटील यांनी दिले, तसेच विशेष मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही आनंदाने जगता यावे यासाठीचा हा प्रकल्प स्तुत्य असून मुलांसोबत त्यांच्या पालकांचा ही विचार करणे हे कौतुकास्पद असल्याचे ही पाटील म्हणाले.



सर्व ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही, त्यामुळे अश्या पद्धतीने समाजातील विशेष मुलांचा सांभाळ करणाऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील सधन व्यक्तींनी योगदान द्यावे असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. तसेच नेत्यांचा किंवा स्वतःचा वाढदिवस हा अश्या घटकांना मदत करून साजरा करण्याची क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा असून त्यानुसार आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष मुलांना मदत करताना सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे असेही खर्डेकर म्हणाले. तसेच आपण दिव्यांग मुलांचा विचार करतो त्यांना मदत करतो पण ह्या मुलांचा सांभाळ करणे हे जिकिरीचे आणि अत्यंत अवघड काम असते त्यामुळे अश्या पालकांचा विचार उमेद फाउंडेशन ने केला हे महत्वाचे असल्याचे ही खर्डेकर म्हणाले. राकेश सणस यांनी प्रास्ताविक केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.








