महापालिका निवडणुकांच्या प्रभाग निहाय मतदार याद्या जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल..

पुणे : महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या जाहीर करण्याच्या कार्यक्रमांमध्ये निवडणूक आयोगाकडून सुधारणा करण्यात आली असून आता प्रारुप मतदार याद्या 23 जूनला प्रसिद्ध करण्यात येणार असून १ जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर ,सोलापूर, अकोला ,नाशिक ,नागपूर ,अमरावती या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १७ जून रोजी प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात येणार होत्या मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून त्या आता 23 जूनला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
सुधारित कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या २३ जूनला प्रसिद्ध करून १ जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. आता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै पर्यंत प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे आदी कामे राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाहीत. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांची विभाजन करताना होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाचे यादीत नाव नसणे आदी दुरुस्त्या यामध्ये केल्या जातात.




