वारजे हायवे परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त..
वारजे : गेल्या अनेक महिन्यापासून वारजे हायवे परिसर व राजयोग सोसायटी परिसरामध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. उन्हाळ्याचे दिवस, वाढलेला प्रचंड उकाडा त्यात सतत होत असलेला खंडित होत असलेला वीज पुरवठा त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
यासंदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी महावितरण च्या डहाणूकर कॉलनी येथील कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून वारजे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
धुमाळ म्हणाले, वारजे परिसरात महावितरणाचा भोंगळ कारभार सुरू आहे. खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्या बाबत वारजे मळवाडी तक्रार केंद्रामध्ये नागरिकांनी दिलेल्या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून वीज पुरवठा व महावितरण संबंधातील इतर समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
एक महिन्यापूर्वी नादब्रम्ह सोसायटी मधील ट्रान्सफॉर्मर लोड आल्याने जळाला होता, परंतु अद्यापही त्यावर कोणतीही उपाय योजना केलेली नाही तसेच हायवे परिसरात रोज दिवसातून २ ते ३ वेळा व ठराविक वेळेला लाईट जात असल्याने नागरिकांचे फार मोठे हाल होत आहेत. जिथे जिथे ट्रान्सफॉर्मर व ( फिडर बॉक्स) डीपी आहे त्या ठिकाणची सुरक्षितता, स्वच्छता व दुरुस्ती नसल्याने फार मोठ्या प्रमाणात कचरा व गवत साठलेले आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला सुद्धा काम करणे अवघड होत आहे. या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी धुमाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.