असे ‘दादा’ सगळ्यांनाच लाभो…!

आपल्या मराठी भाषेत ‘दादा’ हा अनेक कंगोरे असलेला आणि नात्यांबद्दल जिव्हाळा असलेला शब्द. घरातला सर्वात थोरला मुलगा ज्याच्याकडे भविष्यात संगळी जबाबदारी असते, अशा मोठा भावालाही दादा म्हणूनच संबोधिले जाते. अन् हाच व्यक्ती पुढे जाऊन संपूर्ण कुटुंबाचा आधारवड बनतो. असंच कोथरुडकरांना लाभलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील!
केवळ कोथरुड विधानसभेचे आमदार झाले म्हणून नव्हे, तर त्याआधीपासून भाजपच्या आदरणीय दादांचा स्नेह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला. याकाळात त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन मला झाले.
अजित जगताप
(सदस्य : पुणे शहर भाजप)
संघाच्या मुशीत घडलेले एक शिस्तबद्ध स्वयंसेवक, आणि अभाविपसाठी १३ वर्षे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश पिंजून काढून कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे करुन कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम त्यांनी केलं. यात त्यांच्यातील सुसंस्कृत आणि विवेकी राजकारणाची पद्धत, सदैव हसतमुख चेहरा आणि मदतीला तत्पर आदी गुणांमुळे ते कार्यकर्त्यांच्या मनात नेहमीच घर करुन आहेत.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल लिहिताना शब्दसंग्रह देखील अपूरा पडत आहे. कारण, त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे की, ते शब्दात मांडताना एक पुस्तक तयार होऊ शकतं, असं मला वाटतं. पण तरीही, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी आजपर्यंत जितकं केलंय, तितकं कोणीही केलं नसतं, असं मला वाटतं.



मला आठवतंय, विधानसभा निवडणुकीनंतर लगेच कोविड महामारीमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण होते. आपल्या देशात ही साथ रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर संपूर्ण देश आपल्या घरात बंदीस्थ झाला. अशावेळी परगावावरुन शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, एकटे राहणारे आजी-अजोबा, परप्रांतीय मजूर यांची खाण्यापिण्याची मोठी आबाळ होत होती. अशावेळी मला एकदिवस आदरणीय दादांचा फोन आला, आणि म्हणाले की, “अजित…. पुण्यात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, परदेशातील मुलांमुळे इथे एकटेच राहणारे वृद्ध आजी-अजोबा आणि परप्रांतीय मजूर यांची खाण्यापिण्याची मोठी आबाळ होत आहे. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं कर… तुझं कँटिन आहे ना… तर… तिथून रोज दोनवेळचे डबे सुरु कर.. आपण नाममात्र पाच रुपये आकारु. त्यासाठी लागणारा सर्व खर्च आपण देऊ!” दादांचा हा आदेश प्रमाण मानून आम्ही कामाला लागलो. आणि पाच रुपयात कोथरुडमधील अशा घटकांसाठी डबा सुरु केला.
हे काम सुरु असतानाच मला पॅरेलिसिसचा अटॅक आला. कोविड काळात जनतेला मदत करण्यात दादा व्यस्त होते. कोविडच्या भितीमुळे मी-मी म्हणणारे देखील मदतीला येत नव्हते. अशावेळी दादांनी केवळ मला रुग्णालयात दाखल केलं नाही, तर माझ्या पत्नीला धीर दिला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली. त्यांचीही कृती खरंच माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मोठा आधार होती.



यासगळ्या घडामोडीत कोविड आणि त्यानंतरच्या काळातही आदरणीय दादांनी ज्याप्रकारे कोथरुडकरांची काळजी घेतली, ती कुणीही घेतली नसती हे मी आधीदेखील म्हटलंय, आताही म्हणतो. कारण त्यांचं काम हे कोविड काळात सर्वांना आधार देणारंच होतं. कोविड नंतरही अनेकांचे रोजगार गेले होते, ज्यांचं हातावर पोट आहे, अशांना अनेक संकटांचा समाना करावा लागत होता. त्यावेळी त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी रोजगार उपलब्ध करुन दिला. वस्ती भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नागरिकांना मोफत फिरता दवाखाना सुरु केला. तसेच, दोन वर्षात गरीब कुटुंबातील मुलींना नवीन कपडे घेता न आल्याने त्यांना मोफत ड्रेस वाटप, अशी एक-ना-अनेक कामे दादांनी करुन कोथरुडकरांची विस्कटलेली घडी सावरली. हे करताना त्यांनी आपल्या समाजपयोगी उपक्रमाची कधी जाहिरात केली नाही किंवा कधी बडेजाव केला नाही.



गेल्या वर्षीही त्यांनी आपला वाढदिवस ज्यापद्धतीने साजरा केला तो सर्वांसाठी एक आदर्श होता. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घरकाम करणाऱ्य ताईंसाठी मोफत लसीकरण करुन दिले. तसेच रिक्षाचालक काकांना एक हजार रुपये किमतीचे मोफत सीएनजी कुपन देऊन मोठा हातभार दिला. यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्तानं घरोघर दूधवितरक, वृत्तपत्रवितरक, रिक्षाचालक आदींना होणारं रेनकोटचं आणि घरेलू कामगार भगिनींना होणार छत्र्यांचं वाटप करण्याचे त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे ‘सेवा हेच जीवन’ ध्येय मानणाऱ्या दादांनी आपल्या कृतीतून निर्माण केलेला आदर्श समाजातील इतरांनी देखील घेतला पाहिजे.
शेवटी इतकंच दादा हे कोथरुडकरांसाठी सदैव आधार राहिले आहेत. त्यामुळे दादांसारखं व्यक्तीमत्त्व सर्वांना लाभो हीच इच्छा आहे. दादांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इतकंच म्हणतो की, दादा… दादा तुम्ही शतायुषी व्हा! आणि तुमच्यातला हा माणुसकीचा झरा असाच खळखळता राहो, हीच म्हातोबाचरणी प्रार्थना!!!
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !









