राष्ट्रीय

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमध्ये नेतृत्वबदलाच्या हालचाली

नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश काँग्रेसने स्वीकारले असून आगामी काळासाठी पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहे. त्याच निमित्ताने काँग्रेसचे मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याच्याही हालचालींना वेग आला आहे. कमलनाथ हे लवकरच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत झाली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपालही उपस्थित होते. यावेळी मध्य प्रदेशचे नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे आदेश कमलनाथ यांना दिले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी २३० जागांसाठी निवडणूक झाली. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल आला. यावेळी भाजपने १६३ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले. तर, काँग्रेसला अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावे लागले. २०१८ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतु, हे सरकार अवघ्या १५ महिन्यांत पडलं आणि भाजपने सत्ता स्थापन केली.

२०१८ च्या तुलनेत काँग्रेसची यंदाची कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. तर, भाजपने १०९ वरून थेट १६३ जागांवर मजल मारल्याने भाजपाच्या रणनीतीचं कौतुक केलं जातंय. दरम्यान, मध्य प्रदेशचा निकाल हाती आल्यानंतर, कलमनाथ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, आम्ही मध्य प्रदेशातील जनतेचा जनादेश स्वीकारतो. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारू. तसंच, यावेळी कमलनाथ यांनी भाजपचं अभिनंदन केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये