आमदाराच्या चुलत भावास लाच प्रकरणात अटक

पुणे : पोलिसांच्या नावाने तीन लाखाची मागणी करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. तीन लाखाची मागणी करणारे हे दोघे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा. सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती समोर आली आहे. तक्रारदाराने सासवड पोलिसात अर्ज केला होता. त्या अर्जवरून सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोलप यांच्या नावाने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच या मागणीमध्ये गणेश जगतापने मदत केल्याचे समोर आले. यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

अटक केलेल्यापैकी गणेश जगताप हा आमदार संजय जगताप यांचा चुलत भाऊ आहे. तसंच गणेश जगताप हा युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिवही आहे. अक्षय मारणे आणि गणेश जगताप हे पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक क्रांती पवार, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद आयचीत यांनी केली आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे आल्याने आता चर्चेला उधाण आले आहे.



