संविधानावर चालणारी संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी निर्भिडपणे कार्य करणाऱ्या तरुणांच्या पाठीमागे समाजाने उभे रहावे : राजू परुळेकर

“कॉ.अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार” जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते प्रदान…….!
पुणे – समाजातील वंचित घटकाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी व संविधानावर चालणारी संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी निर्भिडपणे कार्य करणाऱ्या तरुणाच्या पाठीमागे समाजाने खंबीरपणे उभे रहावे असे आवाहान जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केले.
कॉम्रेड अशोक मनोहर मित्र परिवार समितीच्या वतीने समाजातील वंचित घटकांना त्यांचे न्याय हक्क मिळावे म्हणून काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना देण्यात येणारा कॉ.अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार 2023 भटक्या विमुक्तांच्या न्याय व हक्कासाठी काम करणाऱ्या शैला वसंत यादव औंध, जि.सातारा या तरूण महिला कार्यकर्तीला व दुसरा पुरस्कार हा समाजात हिंदु-मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी कार्यरत असलेले, “द वायर” या वृत्तवाहिनीचे पत्रकार झिशान फैसल कासकर या निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या तरूण कार्यकर्त्याला पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सदर कार्यक्रम युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांच्या अध्यक्षतेखाली श्रमिक भवन एकलव्य सभागृहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध संगणक तज्ञ अच्च्युत गोडबोले, आनंद करंदीकर, समितीचे डॉ. अनंत फडके, कॉ. उदय भट, कार्याध्यक्ष मधुकर नरसिंगे, कॉ.अनिल घाडगे, कॉ.मुक्ता मनोहर,कॉ.मेधा थत्ते, ॲड. शुभदा शेवडे, कॉ.दिगंबर गायकवाड, कॉ.प्रकाश चव्हाण, कॉ.जीवन सुरूडे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. मेधा थत्ते व समारोप कॉ. सिद्धार्थ प्रभुणे यांनी केले.



दोन्ही पुरस्कार्थीनी सत्काराला उत्तर देताना असे म्हणाले, “भारतीय समाजात धर्माधर्मात निर्माण होणारी तेढ आणि यामुळे दलीत, आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्याकावर होणारे हल्ले तसेच त्यांना न्याय व हक्कापासून वंचित ठेवून समाजात विषमतेची दरी वाढत आहे आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. तसेच आज पत्रकारीतेने आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.









